वसतिगृह आणि छ. राजर्षी शाहु महाराज

वसतिगृह आणि छ. राजर्षी शाहू महाराज

" विद्येवीना मती गेली । मतीविना नीती गेली ।।
 नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।।
 वित्ताविना शुद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।"      असे म्हणत महात्मा जोतिराव फुलेंनी संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानज्योत पेटवली. आणि या ज्ञानज्योतीला तेवत ठेवून घराघरात पोचवण्याचे काम केले ते कोल्हापूर संस्थानच्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी. शिक्षणाशिवाय गरिबांचा , शूद्रांचा उद्धार होणार नाही. दिनदुबळ्यांचे दिवस पालटायचे बळ हे फक्त शिक्षणातच आहे. हे त्यांनी ओळखले. शूद्रांना माणसात आणायचे असेल तर शिक्षण हा एकमेव उपाय आहे. हे त्यांनी जाणले. यासाठी त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात  " गाव तिथे शाळा " अशी घोषणा करून गावागावात शाळा उघडण्याचा सपाटाच लावला. यासाठी त्यांनी लोकांना विश्वासात घेतले. त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शाहूमहाराजांनी समाजातील अंत्यजापासून ते वंजार्‍यापर्यंत सर्वांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांना स्वत:च्या हक्कांची जाणिव करून देण्याचे मोलाचे कार्य राजर्षी शाहुंनी केले.

राजर्षी शाहु महाराजांनी गावागावात शाळा सुरू केल्यामुळे कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. गावागावात गोरगरिबांची मुले शिकु लागली. ज्ञानामृत प्राशन करू लागली. परंतु माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी आवश्यक सर्व सोयी ग्रामिण भागापर्यंत पोहोचविणे त्या काळात अवघड होते. त्यामुळे पुढिल माध्यमिक व उच्च शिक्षण घेणे गरिबीमुळे शक्य होईना. प्राथमिक शिक्षण घेवून घेवून मुले कोल्हापूरला पुढिल शिक्षणासाठी आल्यावर त्यांना त्यांना राहायची व दोनवेळच्या जेवणाची अडचण भासायची. हि रयतेची अडचण महाराजांनी जाणून घेतली. ग्रामिण भागातील हुशार , होतकरू व गरिब मुलांची माध्यमिक व उच्च शिक्षणाची आबाळ होवू नये यासाठी राजर्षी शाहुंनी कोल्हापूरमध्ये वसतीगृहांची स्थापना केली. स्वघरापासून दूर असलेले घर म्हणजे वसतिगृह. अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करून वसतिगृहात्मक शिक्षणाची प्रचंड चळवळ राजर्षींनी कोल्हापूरात सुरू केली. वसतिगृहात्मक शिक्षण हे शिक्षणप्रसाराचे एक प्रभावी साधन आहे. हे त्यांनी ओळखले होते.

राजर्षी शाहु महाराजांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना एकाच वसतिघगृहात ठेवून त्यांचा शैक्षणिक विकास साधावा यासाठी सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये सर्व जातीच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले. त्यावर एक ब्राम्हण अधिकारी नेमला. परंतु काही काळात त्यांच्या असे लक्षात आले कि , त्या वसतिगृहामध्ये फक्त ब्राम्हण समाजातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. या घटनेचा सखोल अभ्यास करून राजर्षी शाहूंनी सर्व शुद्र मागासलेल्या जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची योजना हाती घेतली.

राजर्षी शाहु महाराज हे महाराष्ट्रातील वसतिगृह शिक्षणाचे पहिले शिल्पकार होत. जातवार वसतिगृह स्थापण्यामागे राजर्षी शाहुंची भूमिका हि , " पशूने पक्ष्यांचे पुढारीपण करू नये व पक्ष्याने पशूंचे पुढारीपण करू नये "  या उक्तिप्रमाणे होती. मेंढराच्या कळपाचा मालक म्हणून मेंढपाळाला नेमले  तर तो मेंढरांचे काय करेल हे वेगळे सांगायला नको. त्याप्रमाणे प्रत्येक जातीने आपले हित ओळखूनच ते कसे साध्य करावे , यासाठी प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र  वसतिगृहांच्या सोयी उपलब्ध करून दिल्या.

शिक्षणात ज्या ज्या जाती मागे पडल्या आहेत , त्या जातींना " एकाच जातीचे " मानून राजर्षी पुढे घेवून गेले. अज्ञान हे आपल्या पाचविलाच पुजलेले आहे. ब्राम्हणांनीच ज्ञान घ्यावे - द्यावे असा चुकिचा समज या मागासलेल्या जातींमध्ये घर करून बसला होता. तो समज राजर्षी शाहुंनी पुसुन टाकण्यासाठी मुसलमानासकट सर्व जातीजमातींची स्वतंत्र वसतिगृहे कोल्हापूरात सुरू केली. समाजमनावर जातिनिष्ठतेचा असलेला पगडा ओळखूनच त्यांना जातवार वसतिगृहे काढण्यास प्रोत्साहन दिले. खालच्या जातींनी शिक्षणातून आपली सुधारणा करून आपला दर्जा वाढवून वरच्या पायर्‍यावर चढण्याचा प्रयत्न करावा असे राजर्षी शाहुंना वाटे. राजर्षी शाहुंनी दि. १८ एप्रिल १९०१ साली सर डब्लू. टि. माॅरिसन (तत्कालीन राजकिय प्रतिनिधी) यांचे हस्ते दसरा चौकात पहिल्या वसतिगृहाचे औपचारीक उद्घाटन केले. त्या वसतिगृहाचे नाव होते , " महाराणी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग इन्स्टिट्युट ". या वसतिगृहासाठी शाहुंनी दसरा चौकातील आपल्या मालकीची इमारत दिली. या वसतिगृहात मराठा , महार , मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यानंतर त्यांनी सर्व जाती धर्मासाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली.

राजर्षी शाहु महाराजांनी स्थापन केलेली काही प्रमुख वसतिगृहे व त्यांचा स्थापना दिनांक पुढिलप्रमाणे आहे.

१) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस ( मराठा समाज - १८ एप्रिल १९०१ )
२) दिगंबर जैन बोर्डिंग ( जैन समाज - एप्रिल १९०१ )
३) वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह ( लिंगायत समाज - १९०६ )
४) मुस्लिम बोर्डिंग ( मुस्लिम समाज - १९०६ )
५) श्री. नामदेव बोर्डिंग ( शिंपी समाज - २ एप्रिल १९११ )
६) दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग ( सोनार समाज - २४ डिसेंबर १९०८ )
७) इंडियन ख्रिश्चन होस्टेल ( ख्रिश्चन समाज - ७ जुन १९१५ )
८) आर्य समाज गुरूकुल ( आर्य समाज - १९१८ )
९) नाभिक विद्यार्थी वसतिगृह ( नाभिक समाज - २४ जुलै १९२१ )

              श्री. गुलाब बिसेन
    
           मो. नं. ९४०४२३५१९१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा