सुगरणिचं पिल्लु
०©० सुगरणिचं पिल्लु ०©०
शाळा सुटायची वेळ झाली होती. मी मुलांना घरचा अभ्यास दिला. अभ्यास देवून होताच मुलांनी दफ्तर पाठिवर घेत घरचा रस्ता धरला. मी शाळेला कुलुप लावून त्यांच्या मागोमाग निघालो. मुख्य रस्त्यावर येताच मला मुलांचा दंगा ऐकायला आला. काय झाले हे बघायसाठी मी आवाजाच्या दिशेने बघितले तर रस्त्याच्या कडेला मुलांनी घोळका केला होता.
" अरे धरू नको त्याला, चावल ते "
" अरे धर , नाही चावत , बारकं हाय लेका.. एवढ्याला घाबरतोस व्हय !"
" त्याला पाणी पाजुन , घरट्यात सोडुयाकिरं."
मला मुलांचं काय चाललय काहि कळेना. म्हणून मी रस्त्याकडेला गाडी लावली आणि मुलांना बाजुला करत बघु लागलो तर एक सुगरणिचं पिल्लु ! नुकतचं उडायला शिकलेलं , रस्त्याकडेला भोपळ्या वेलीत पानांमध्ये लपण्याचा प्रयत्न करत होता. मुलांच्या दंग्याने तो पुरता घाबरला होता.
मी जाताच मुलांचा गोंगाट कमी झाला. त्यामुळे तो थोडा शांत झाला. मि अवतीभवती सुगरण दिसते काय बघितले पण जवळपास कुठलाही पक्षी दिसला नाही. त्यानंतर मुलांकडे जवळपास सुगरणिचं घरटं आहे काय ? याची चौकशी केली. परंतु घरटे तिथुन बरेच लांबवर असल्याचे समजले. याचा अर्थ ते पिल्लु उडत तिथपर्यंत आले होते. मी मुलांना पिल्लु चावत नसल्याचे सांगितल्यावर दुसरीच्या सोहमने त्याला अलगद हातात घेतले.
आम्ही ते पिल्लु घेवून शाळेत आलो. शाळेत आणल्यावर त्याच्या अंगावर जखम पर नाही ना याची खात्री केली. पाणी पाजले पण त्याने पाणी पिण्यास स्पष्ट नकार दिला. मी त्याला एका हातात घेवून दुसरा हात त्याच्या अंगावरून फिरवला. मुलांनीही त्याला हातावर घेतले. थोडावेळ मुलांच्या अंगाखांद्यावर खेळल्यावर आम्ही त्याला शाळेपाठीमागील झाडित सुरक्षित ठेवून त्याचा निरोप घेतला.....
..... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा