धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन 

  • डॉ. कैलास दौंड 


विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक आणि शाळांचे मोठे योगदान असते. विद्यार्थ्यांना येथे आकार मिळत असतो, येथूनच त्यांचे व्यक्तिमत्व फुलायला, आकारास यायला सुरुवात होते. बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरणाऱ्या गुणविशेषावर लक्ष ठेवणाऱ्या आणि त्यासाठी उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचा देखील विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव असतो. गुलाब बिसेन यांनी त्यांच्या शिक्षकी पेशाला २००७ च्या उत्तरार्धात सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी येथे ते रुजू झाले. इयत्ता ४थी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळेत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. साहजिकच विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण झाल्यामुळे या शाळेचे उच्च माध्यमिक शाळेत रुपांतर झाले. हा बदल गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही प्रकारचा होता.


बादेवाडीतील शाळेमध्ये त्यांनी अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. विद्यार्थी बँक, स्कूलशॉप, हस्ताक्षरवीर, पाणपोई, बालचित्रपट महोत्सव, पत्रसंवाद, तरंग वाचनालय, आनंद बाजार, आम्ही व्यवहारज्ञानी या सारख्या असंख्य उपक्रमांतून निवडक ६१ उपक्रमाचा समावेश असलेले 'सृजनशाळा' या पुस्तकाचे सन २०१९ या वर्षी प्रकाशन केले. त्यामुळे या उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळाले.


विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देणे हा गुलाब बिसेन यांचा स्थायीभाव ! वैष्णवी सुतार या सातवीतील विद्यार्थीनीने लिहिलेल्या कवितांचा संग्रह 'मोहर' प्रकाशित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.


जीवन शिक्षण मासिकाने बिसेन यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत. 'जाऊ फुलांच्या जगात', 'खाऊचा डबा', 'मोहर फुलला' अशा उपक्रमावर आधारीत लेख प्रकाशित केले.


गुलाब बिसेन यांनी विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी विद्यार्थी बँक शाळेत सुरू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागून या बँकेची वार्षिक उलाढाल तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत पोहचली. सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात 'गणपतीला वही, पेन' अर्पण करण्याचा उपक्रम राबवला. त्यामुळे शाळेतील आणि परिसरातील विद्यार्थ्यांना वही-पेन असे शैक्षणिक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले. परिसरातील लोकांना देखील आनंद मिळाला. शाळेत शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांतही सहभाग घेत गुलाब बिसेन यांनी विद्यार्थ्यांचा भावनिक विकासही साधण्यासाठी मदत केली. ज्ञानरचनावादाचा आणि आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केला. विद्यामंदिर उंड्री (ता. पन्हाळा) शाळेत लोकसह-भागातून तसेच वैयक्तिक निधी खर्च करून शाळेचा कायापालट करण्यात त्यांनी आपला सहभाग दिला.


जिल्हा परिषद चंद्रपूरच्या जि.प. उच्च प्राथ. शाळा वायगाव (ता. ब्रम्हपुरी) येथे बदली झाल्यावर गुलाब बिसेन या शाळेमध्ये देखील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम उत्स्फूर्तपणे राबवणे त्यांनी सुरूच ठेवले आहे. विविध उपक्रमामुळे विद्यार्थी कार्यरत राहतात आणि स्वतःच्या कृतीतून नवीन शिकत देखील राहतात. त्यांचा स्वतःचा एक दृष्टिकोन तयार होतो. त्यांना वाचन, मनन आणि अभ्यासाची सवय लागते हे गुलाब सरांच्या कृतीतून दिसून येते.


गुलाब बिसेन यांच्या कार्याचा आणखी एक पैलू म्हणजे ते पोवारी या बोली भाषेसाठी रचनात्मक स्वरूपाचे काम करत आहेत. पोवारी बोलीमध्ये बालसाहित्याची निर्मिती व्हावी यासाठी ते बालकथा, कवितांचे लेखन करतात. सोबतच इतर साहित्यिकांचे बालसाहित्य वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी 'झुंझुरका' हे इ. बालमासिक चालवतात. अनेक पोवारी पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन देखील त्यांनी केलेले आहे. 'खोपळीमाकी दिवारी' (बालकथा संग्रह), 'फिपोली' (संपादित बालकविता संग्रह), 'नवतरी गावतर' (पोवारी बालकथा संग्रह) ही पोवारी बोलीतील साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. बाबांची सायकल आणि इतर कथा हा त्यांचा बालकथा संग्रह देखील छान आहे.


'वाचन दिवाळी', 'लिहिते होवू !', 'शिवार भेट', 'सुसज्ज ग्रंथालय', 'लेखक आपल्या भेटीला', 'कवी कट्टा' माझी दैनंदिनी या उपक्रमांनी त्यांनी विद्यार्थ्यांना सतत आनंददायी व कार्यरत ठेवले आहे. विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी विषयाचे कसलेही बंधन ते घालत नाहीत विद्यार्थ्यांना पुरेसा कागद उपलब्ध करून देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव मिळतो. शालेय परिपाठांमध्ये विद्यार्थी रोज एका पुस्तकाचे त्यांच्या क्षमतेनुसार परिक्षण सादर करतात. 'वाचन कट्टा' या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत वाचनासाठी भरपूर उपयोग होतो. गुलाब बिसेन यांनी कविता लेखन या उपक्रमातंगर्त जुलै २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितंमधून निवडक २६ कवितांचे संपादन वायगावची बालकविता या कवितासंग्रहात केले आहे. यासोबतच ते बीज बँक, परसबाग, क्षेत्रभेट, फुल शेती असे उपक्रम देखील ते राबवतात आणि विद्यार्थी त्यामध्ये आनंदाने सहभागी होतात.


विद्यार्थ्यांना कृतिशीलता आवडते, स्वतः काहीतरी करून बघायला आवडते, नवनिर्मिती करायला आवडते, त्यामुळे अशी संधी देणारे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना खूप आवडत असतात. साहजिकच गुलाब बिसेन विद्यार्थ्यांचे आवडते बनले आहे. बिसेन यांनी विद्यार्थ्यांना कार्यरत ठेवले आहे. तसेच स्वतः देखील लेखन, वाचन सुरू ठेवले आहे. पूज्य साने गुरुजी यांच्या धडपडणाऱ्या मुलाप्रमाणे धडपडणारे शिक्षक म्हणून गुलाब बिसेन यांचे कौतुक करता येईल.

- डॉ. कैलास दौंड (लेखक नामवंत साहित्यिक असून प्रयोगशील शिक्षक आहेत.)

(कथामाला या मासिकाच्या फेब्रुवारी 2026 च्या अंकातून साभार)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा