शोर्य, त्याग आणि बलिदानाची गौरवगाथा - लढाई
शोर्य, त्याग आणि बलिदानाची गौरवगाथा - लढाई हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ती आपल्या मावळ्यांच्या एकनिष्ठेच्या बळावर. अशा एकनिष्ठ मावळ्यांनी स्वराज्यासाठी शेकडो लढाया लढल्या आणि जिंकल्याही. अशा शिवकालीन लढायांतील निवडक पंचवीस लढायांची प्रेरक गाथा लेखक संजय येरणे 'लढाई' या पुस्तकातून बालवाचकांसाठी घेऊन आले आहेत. शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सोप्या शब्दांत हे पुस्तक सांगत आहे. कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये हळद- बेळसूरच्या लढाईपासून ते भूपाळगड लढाईपर्यंतच्या लढाया मोजक्या शब्दांत बालवाचकांसाठी मांडल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक हे ऐतिहासिक असले तरी स्वराज्याच्या विविध लढाया समजून घेण्याच्या दृष्टीने लेखकाने बालकांचा विचार करून सोप्या भाषेत मांडल्या आहेत. स्वराज्याची पहिली लढाई हळद- बेळसरच्या लढाईचे वर्णन वाचताना शिवरायांच्या मावळ्यांचे धैर्य आणि शौर्याची प्रचिती येते. शिवरायांच्या गणिमी कावा या युद्धतंत्रांची या लढाईतून ओळख वाचकाला होते. वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रत...