अपेक्षांचे ओझे

##   अपेक्षांचे ओझे  ##

सकाळचे सात सव्वासात वाजले असतील , सुट्टिचा दिवस असल्याने आंघोळ करून चहाचा आस्वाद घेत मी खुर्चीत बसलो होतो. रेडिओवर सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम सुरू होता. "जिवन गाणे गातच रावे , जिवन गाणे."  प्रसन्न सकाळी सुमधुर गितांनी आणखिनच प्रसन्न वाटत होते. अशात एकाएक माझा मोबाईल खणाणला. मी मोबाईल उचलुन बोलणार एवढ्यात मला समोरून आवाज आला ,
 " सर , आपल्या गावातील " विक्रम " मरण पावला." समोरच्याचे बोलणे ऐकुन मला काहि सुचेनाच. मी त्यातच त्याला विचारायला लागलो ,
" हे असं अचानक कसं काय घडलं ? "
 " सर , नोकरीच्या निराशेतून घरच्यांशी थोडा वाद होवून त्यानं आत्महत्या केली बघा."
असं म्हणत पुढच्या व्यक्तीने मोबाईल ठेवला.

सकाळी सकाळी मिळालेल्या या दु:खद वार्तेने सकाळचे प्रसन्न वातावरण दवबिंदु जसे सूर्यकिरणांच्या उष्णतेने क्षणात विरून जातात तसे क्षणार्धात हवेत विरून गेले. त्यात शेवटच्या वाक्याने मी सून्नच झालो. वीस बावीस वर्षाचा तरूण असं कसं करू शकतो ? तो एकदोनदा अपयशी झाला असेल , म्हणून काय झालं ! जगात शेकडोवेळा अपयश पचवत आपले ध्येय गाठणारी अनेक माणसं आहेत. या व्यक्तिंनी त्यावेळी जर आत्महत्तेचा पर्याय निवडला असता तर त्यांना यशाचे शिखर गाठल्यावर मिळालेला माण , प्रतिष्ठा , सुख कधीच मिळाले नसते. या जगात अशक्य असं काहीच नाही. एक ना अनेक प्रश्नांचा मारा माझ्या मनावर  होत होता. माझेच प्रश्न मला टोचत होते. माझा या घटनेशी तसा जवळचा संबंध नसतानाही मला ते अस्वस्थ करत होते आणि म्हणत होते ," हे असं का घडलं असेल ? " घडायला काय , जगात काहीही घडु शकतं ! पण एवढ्या कोवळ्या वयात असे टोकाचे पाऊल उचलताना त्या मुलाचे पाय थरथरले नसतील का ? त्याने क्षणभर आपल्या आईवडीलांचा , जाणते अजाणतेपणी बघितलेल्या स्वप्नांचा विचार केला नसेल का ? जे चित्र आपण स्वत: काढले त्यात रंग न भरताच अर्ध्यावर डाव मोडुन कुणी कसा काय जावू शकतो ? असे शेकडो अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे न देताच तो तरूण या जगाचा कायमचा निरोप घेवून गेला हेच सत्य होतं. तेच मला सारखं बोचत होतं.

जगातील कुठल्याही आईवडीलांना आपली मुले आयुष्यात यशस्वी व्हावीत असेच वाटत असते. मुलांचे अपयश कुठल्या आईवडिलांना बघवेल ? ज्या मूलरूपी रोपट्याला आईवडीलांनी जन्माला घातलं. त्याला फुलवलं आणि बहरवलं , ते मूल आपले नी फक्त आपलेच आहे असे त्यांना वाटणे साहजिक आहे. मुलांनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी आईवडीलांची ईच्छा असते. त्याच्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न ते करत असतात. वेळप्रसंगी स्वत:लाही गहाण ठेवायला ते मागेपुढे बघत नाहीत. घाम गाळुन , रक्त आटवून कष्ट करायचे पण मूलरूपी रोपटे फुलवायचे. एवढेच त्यांच्या जिवनाचे ध्येय असते. वेळप्रसंगी स्वत:च्या स्वप्नांचा चुराडा झाला तरी चालेल , पण मुलांना काहीही कमी पडु द्यायचे नाही. हे पालकांचे ध्येय असते. मग नेमकं चुकतय कुणाचं ?

आईवडील मुलांकडुन अपेक्षा ठेवण्यामागे मुलांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत असतात. हे कष्ट घेताना आपण आपल्या मुलाला फक्त यशस्वी होण्यासाठीच जन्म दिलाय असा काही पालकांचा समज झालेला दिसतो. पण आपले मूल हे केवळ आपलेच नसून ते स्वत:चेही असते. त्याला स्व:तचे मन आहे. हे ही पालकांनी समजुन घेणे गरजेचे आहे. पालक आपले स्वप्न आपल्या मुलांत बघतात. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी , अशी भाबडी अपेक्षा मुलांच्या जीवावर उठु शकते याची जाणीव पालकांनी ठेवावी.मुलांचे आयुष्य , त्यांची स्वप्ने आणि आईवडीलांच्या अपेक्षा (त्या कधीकधी अवास्तवही असतात.) यांच्यात द्वंद्व निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.

 आपले स्वप्न मुलांच्यात बघणारे आईवडील मुलांच्या कुवतीकडे डोळेझाक करतात. मुळात वडीलांच्या कुवतीप्रमाणे मुलात कुवत असेलच असे नाही. हे एखाद्या डाॅक्टर पित्याने आपला मुलगाही डाॅक्टरच व्हावा , अशी अपेक्षा करण्याप्रमाणे आहे. कदाचीत थोडी मुले आपल्या पालकांच्या अपेक्षांची पूर्तता करेतीलही.पण म्हणून "सब घोडे बारा टक्के "  असा न्याय देणे कितपत योग्य राहील ? मुलाने एखाद्या क्षेत्रात समाधानकारक यश नाही मिळवले म्हणून तो जीवन जगण्यास असमर्थ आहे. असा त्यावर शिक्का मारणे योग्य ठरेल ?

आईवडील आपल्या मुलांवर अगदि बालपणापासूनच नकळत करीअर संबंधी , त्यांच्या जगण्याविषयीची अवास्तव भीती मुलांच्या मनावर बिंबवत असतात. अमुक केलं कि अमुक मिळेल. तमुक केलं कि तमुक मिळेल , अमुक एवढा अभ्यास केला कि तमुक एवढं मिळेल . अशावेळी मुलांच्या आवडीनिवडी , छंद यांचा विचार किती पालक करतात ? आजही अनेक आईवडील मुलांना जोपर्यंत एखादि नोकरी मिळत नाही , तोपर्यंत मुलांना यशस्वी समजत नाहीत. भलेही मुले उत्तम शेती , किंवा अन्य व्यवसाय करत असतील. पालकांच्या अशा व्यवहारहिन , तर्कशून्य समजुती मुलांच्या प्रगतीत बाधा ठरतात.

आपल्या समाजात ग्रामिण व शहरी अशा दोन्ही भागांत अजुनही अनेक अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भूतबाधा. आपल्या घरातील , शेजारपाजारातील , पाहुण्यांचा एखादा मूलगा नोकरी मिळवण्यामध्ये अयशस्वी होत असल्यास त्याच्यावर कुणीतरी करणी केली असेल किंवा जादुटोणा करून त्याला अयशस्वी केले जातेय असा समज करून घेतात. त्यामुळे आईवडील अंधश्रद्धेला बळी पडुन बुवाबाजीचा आधार घेतात. नोकरी मिळवण्यात यश मिळत नसल्याने अनेक आईवडील देवाला कोंबडे, बकरे कापताना तसेच बुवाबाजांचा सल्ला घेताना मी स्वत: अनेकदा बघितलेय. या सर्व प्रकाराने कोणताच लाभ न होता पदरी निराशाच पडते. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाणार्‍या मुलांचे अधिकच खच्चिकरण होते. यश अपयश जर बुवाबाजीच्या भरवशावर अवलंबून असते तर प्रगत राष्ट्रांनी किंवा प्रगतशील राष्ट्रांनी आपला पैसा , श्रम , बुद्धी आणि मनुष्यबळ वाया न घालवता बुवाबाजांकडून राष्ट्राची प्रगती साधली नसती का ?

त्याचबरोबर सध्याची तरूणपिढी ही टेक्नोसेव्ही आहे. स्मार्टफोनच्या युगात नवनविन तंत्रज्ञानाचा वाढता वापर या मुलांसाठी मारक ठरत आहे. सोशल साईट्सवरील तरूणांची मांदियाळी अधिकच वाढत असून फेसबूक , व्हाट्सअॅप , इंस्ट्राग्राम इत्यादिंच्या वापराने वैयक्तीक आयुष्यावर परीणाम पडत आहे. मागील काही दशकांपर्यंत मुले गावात शेजारात , कट्ट्यावर , पारावर बसून चर्चा करताना दिसायचे. मनमोकळ्या गप्पा , खेळ यामध्ये रमायचे आता मात्र कट्य्यावर बसलेली मुले मोबाईलमध्ये डोकं घालुन बरसेले असतात. शेजारपाजारात काय घडतय याचा कुणाला पत्ता नसतो. बघिल तिथे मुलांनी मोबाईलमध्येच डोकं घातलेलं असते.यामुळे मुले शरीराने घरात परंतु मनाने बाहेरच्या जगात असतात. घरच्यांशी ना चर्चा ना बातचित. मग मन मोकळं कुठं होणार ?  सोसल साईट्स ह्या दूरस्थ व्यक्तींशी संपर्कात राहण्यासाठी उपयुक्त साधन आहेत. परंतु त्यांच्या अतिवापरामुळे जवळची माणसे दूर जात आहेत. माणसामाणसातील संवाद तुटत चालला आहे. प्रत्यक्ष   नात्यांतून मिळणारे प्रेम , जिव्हाळा , आपुलकी या मुलांना कसे मिळणार ? मुले या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष आयुष्यात कमी आणि आभासी आयुष्यात अधिक रममान होत चालले आहेत. त्यामुळे नात्यांतील ओलावा दिवसेंदिवस आटत चाललाय. घरात माणसांमध्ये होणारी सुखदु:खांची देवाणघेवाण बर्‍याचअंशी खंडित होत चालली आहे. त्यामुळे मानसिक दडपणात वावरणार्‍या मुलांना आपले मन मोकळे करायला जागाच उरली नाही. मन मोकळे करायला हक्काची माणसे म्हणजे आईवडील , मित्र मैत्रीण , बहिणभाऊ , पाहुणे यांच्यासोबत असलेला संवाद या तंत्रज्ञानाच्या अवाजवी वापराने कमी झाल्याने मुले आपले मन मोकळे करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील एखादि खदखद कमी न होता अधिकच वाढत जाते. आभासी जगात तरूण मुले गुरफटल्याने ते ना आईवडीलांशी मनमोकळा संवाद साधु शकत ना पाहुण्यांशी . त्यामुळे आज खरी गरज आहे ती मुले - आईवडील , आईवडील - मुले , मुले - मित्रमैत्रीनी यांच्यात मनमोकळा सुसंवाद घडण्याची. त्यासाठी आभासी जगापेक्षा प्रत्यक्ष जगात वावरणेच अधिक उत्तम.

एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरलेल्या मुलांना पालकांनी समजुन घेतले नाही. त्यांच्यातील उणीवा ओळखल्या नाहीत, तर अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुले दडपली जातात. आणि मग सुरू होते सभोवती निराशेचं काळोख दाटायला. निराशेच्या काळोखाने मुलांचे मनरूपी आसमंत एकदा का व्यापला कि  त्यातून बाहेर पडणे अशक्य होतं. अशावेळी घरच्यांची त्यांना मिळने आवश्यक असते. स्वामी विवेकानंद म्हणतात , " जगात किती लोकं यशस्वी होतात , ही आश्चर्याची बाब नाही. तर कितीतरी लोकं अपयशातून बाहेर पडून यश मिळवतात. ही आश्चर्याची बाब आहे." अपयश हि यशाची पहिली पायरी आहे. अपयशाचे जीने चडुनही यशस्वी होणारे अनेक लोकं आपल्या अवतीभवती असतात. त्याच्याकडुन शिकवण घेत यश गाठण्यासाठी लागणारे नेमके प्रयत्न करण्याची गरज आहे. यश मिळवण्यासाठी काय करावे यासोबतच अपयश पदरी पडल्यास अपयशातून यशाकडे वाटचाल कशी करावी याचे मार्गदर्शन मुलांना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांचे आयुष्य हे त्यांचे स्वत:चे असलेतरी ते राष्ट्राशी निगडीत आहे. राष्ट्रउभारणीत त्या देशातील नागरीकांची खूप गरज असते. देशातील प्रत्येक तरूण हे देशाची बहुमोल संपत्ती आहे. मनुष्यबळाच्या अभावी राष्ट्र दुबळा व दुर्बल बनतो. त्यामुळे प्रत्येक तरूणाने आपल्या आयुष्याचे मोल जाणून घेणे गरजेचे आहे. तद्वतच पालक आणि समाज यांनी मुलांना समजुन घेणे आणि आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांना या जगात मूक्त विहार करत जगु देणे गरजेचे आहे................गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा