जबाबदारी तुमची आमची

##  जबाबदारी.... तुमची....आमची  ##

एप्रिल महिण्यात मी कोल्हापूरला राजारामपुरी पाचबंगला परिसरात फळांच्या दुकानात उभा असताना रेल्वे फाटकाजवळ अचानक धुराचे लोट आकाशात उठु लागल्याने परिसरातील सगळी जनता तिकडे बघु लागली. सुरूवातीला कुणीतरी कचरा पेटवला असेल असे समजुन मी तिकडे दुर्लक्ष केले. परंतु क्षणाक्षणाला वाढत जाणारा एवढा धुर साध्या कचर्‍याने निर्माण होणे शक्य नाही. हे लक्षात आल्यावर मी जवळ जावून बघितले तर कुणीतरी तिथे थर्माकाॅल पेटवून पसार झालेला होता. हा धुर जवळजवळ पंधरा मिनिटे आकाशाकडे धाव घेत होता.

थर्माकाॅलची विल्हेवाट लावण्याची हि पध्दत आणि ठिकाण त्या महाभागाच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवून गेली. भर वस्तीत एवढा वायू प्रदुषण करताना त्या महाभागाने कुठलाही विचार केला नव्हता हेच यातून प्रतित होत होते. कोल्हापूर शहरातील हा वर्दळिचा भाग. परीसरात रेल्वे स्टेशन , बसस्थानक तसेच दवाखाने आहेत. अशा ठिकाणी कचरा पेटवणं नक्कीच हितकारक नाही. अशा वस्तुंची विल्हेवाट लावणे सर्व सामान्यांसाठी खुप अवघड होवून बसत असले तरी ते भर रस्त्यावर पेटवून विल्हेवाट लावण्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही.

थर्माकाॅल , प्लॅस्टिक यावर शासनाने बंदि घालुन एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे प्लॅस्टिक वापरावर अनेक निर्बंध आले असले तरी अजुनही अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा खुलेआम वापर सुरूच आहे. प्लॅस्टिकचा जास्तीत जास्त वापर किराणा माल दुकानात आणि मटण व भाजी बाजारात होत असल्याने त्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. या प्लॅस्टिक बंदिने लोकांमध्ये जाणिव जागृती होत असल्याचे दिसून येत आहे. हे नक्किच चांगले लक्षण आहे.  थर्माकाॅलच्या वापरावरही शासनाने निर्बंध घातल्याने गणेशोत्सवात होणारा थर्माकाॅलचा कचरा नक्किच कमी होईल. यातून पर्यावरणपूरक साहित्याला चांगले दिवस येतील.

परवा मी व्हाट्सअॅप बघत असताना एका समुहावर मला एका निपचित पडलेल्या पाळीव प्राण्याचा फोटो दिसला. सुरूवातीला तो फोटो बघण्याकडे मी दुर्लक्षच केला पण हा फोटो पाठवणार्‍याने का पाठवला असेल ? या प्रश्नाने त्या फोटोत नक्की काय दडलय हे बण्याची इच्छा निर्माण होवून मी तो फोटो झूम करून बघितला. त्यात त्या प्राण्याचे पोट पूर्णपणे प्लॅस्टिकने तुंबून तो प्राणी मृत झाला होता. फोटो बघुन जीव कासाविस झाला. कारण या मुक्या जिवाला मृत्यूच्या दारात ढकलण्याचे काम बुद्धिचतुर माणवाने केला होता.

असे पृथ्वीच्या पाठीवर अनेक पशु पक्षी प्लॅस्टिकमुळे मृत पावतात. खरेतर त्यात त्यांची कोणतिही चूक नसते. मानव करत असलेला प्लॅस्टिकचा अतिवापर यामागचे खरे कारण आहे. प्लॅस्टिकचा अतिवापर मुक्या जिवांना आयुष्यातून उठवत आहे. माणवासोबत संपूर्ण वसुंधरा अबाधित ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या उत्पादनावर बंदि घातल्यास त्याला पर्याय शोधले जातील आणि अस्तित्वात असलेल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याकडे लोकांचा कल वाढायला मदत होईल...........शेवटि हि वसुंधरा सुजलाम सुफलाम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलणे गरजेचे !........गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा