सावधान , मुले शिकत आहेत

सावधान...... मुले शिकत आहेत

दुपारचे दिड वाजले असतील , त्यादिवशी भूक लागल्याने मुलांचे अभ्यासात लक्ष नव्हते. सूचना देवूनही मुलांची चुळबुळ सुरूच होती. त्यामुळे मुलांची परिस्थिती बघुन दुपारचे जेवन येईपर्यंत मी मुलांचा गप्पांचा तास घ्यायला सुरूवात केली. गप्पांचा तास म्हणजे मुलांशी अनौपचारीक गप्पा करत त्यांना बोलतं करणं. मुलांनी सगळे दफ्तर आवरले आणि गप्पांचा तास सुरू झाला. खेड्यातील मुले म्हटल्यावर साहजीकच त्यांच्या दैनंदिन उपक्रमांपासून शेतशिवारापर्यंत चर्चा रंगु लागली. मधे मधे प्रश्न विचारत मी त्यांना बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. दुपारचे जेवन येइपर्यंत मला किल्ला लढवायचा होता. त्यामुळे मुलांना बोलतं ठेवत मी किल्ला लढवत होतो.

चर्चा रंगात आली असतानाच मी मुलांना एक प्रश्न केला ,
" मुलांनो तुमच्यापैकी कोण कोण आईला कामात मदत करतो ? "
यावर सर्व मुले आपआपले उत्तर सांगु लागले. धुणी भांडीपासून अगदि जनावरांना धुण्यापर्यंतची कामे मुले सांगु लागली. मुलांचा गप्पांतील सहभाग बघुन मला खुप आनंद झाला. मुले स्वत:हुन या गप्पांमधुन व्यक्त होत होते.
"सर , आणि प्रश्न विचारा."
असे म्हणत गप्पांमध्ये अधिक सहभागी होत होते. गप्पा सुरू असतानाच मी मुलांना पुढचा प्रश्न केला.
" तुम्ही घरी वडीलांनी किंवा वडीलधार्‍यांनी सांगितलेली कोणकोणती कामे करता ?"
याही प्रश्नाच्या उत्तरात मुले व्यक्त होताना चढाओढ सुरू होती. मुले शेतातील वैरण आणायला मदत करण्यापासून ते घरात चहाचा कप देण्यापर्यंत सांगु लागले. या गप्पांतून मला असे लक्षात आले कि , माझ्या वरील प्रश्नाच्या उत्तरात वर्गातील पन्नास टक्के मुलांनी ,
 "आम्ही वडीलांसाठी दुकानातून तंबाखु आणून देतो."
असे सांगितले. त्यामुळे मला थोडा धक्काच बसला. परंतु असे काम घरच्यांकडुन सरसकट लहान मुलांना लावले जाते. ही लहान मुलेही आज्ञाधारकपणे किंवा कधी चाॅकलेटच्या आमीशाने मोठ्यांनी सांगितलेले कामे करतात आणि शाबासकी मिळवतात. परंतु यातील काही मुले नेहमीच्या कामाला बगल देत मोठ्यांचा डोळा चुकवून कधीतरी अशा पदार्थांची उत्सुक्तेपोटि चव घेण्याचा प्रयत्न करतात आणि व्यसनाच्या विळख्यात सापडतात.

वरील प्रसांगाने मला माझ्या बालपणी घडलेली एक गोष्ट आठवली. मी दुसरी तिसरीत शिकत असताना आमच्या गावातच राहणारे आमचे एक नातेवाईक दर दिवशी आमच्या घरी यायचे. ते आजोबांचे मित्र असल्याने रोजच त्यांच्यात गप्पांची मैफल जमायची. आमच्या घरात कुणालाही तंबाखु , बीडी सिगारेट किंवा दारूचे व्यसन नव्हते. परंतु आमच्या या नातेवाईकाला बीडी ओढण्याची सवय होती. एका बैठकीत किमान दोनतरी बीड्या ते संपवायचे. बर्‍याचदा ते आपल्यासोबत काडीपेटि (माचीस) घेवून यायचे परंतु काही वेळा ती आणायची विसरली किंवा संपली कि मला बोलवायचे आणि मला चुलीतून बीडी पेटवून आणायला सांगायचे. मीपण आज्ञाधारकपणे ते काम आवडीने करायचो. त्यांना बीडी ओढताना बघुन माझे कुतुहल जागे व्हायचे आणि या बीडीची चव कशी असेल ? असा प्रश्न मला पडायचा.

असेच एकदा घरी कुणी नसल्याचे बघुन मी पाहुण्यांनी ओढलेल्या बीडीचा तुकडा घेतला. तो चुलीतील विस्तवाने पेटवला आणि तोंडात घेतला. तोडांत घेताच धुराचा एक झोत माझ्या नाकातोंडात गेला. त्या धुरामुळे मला खोकला सुरू झाला तो काही थांबता थांबेना. मला त्या धुराच्या वासाने गुदमरल्यासारखे वाटु लागले. हा प्रकार घरात कुणाला कळुनये म्हणून घरातून मागच्या अंगणात पळ काढला. आडोशाला बसून खोकु लागलो. दहा पंधरा मिनीटे मला खोकला येत होता. बीडीच्या एका झुरक्याने मला दिवसाढवळ्या तारे दाखवले होते. खोकला शांत झाल्यावर मी घरात आलो. परंतु तोंडाचा वास काही जात नव्हता. त्यामुळे आजीने दात घासायसाठी वाळवून ठेवलेला बाभळीचा पाला मी चावून पाण्याने चुळ भरली. त्यामुळे तोंडाचा वास गेला. घरात कुणाला काही कळायच्या आत मी माझा संपूर्ण कार्यक्रम संपवला. आणि परत बीडी हातात घ्यायची नाही , अशी प्रतिज्ञा केली. ती आजतागायत अबाधित आहे आणि इथुन पुढेही राहील.

लहान मुले निरागस असतात. तसेच ते अनुकरणप्रियही असतात. चांगले वाईटात ते भेद करू शकत नाहीत . त्यामुळे अशा घरातील लहान मुलांना कामे सांगताना मोठ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आज मोठ्यांना दुकानातून तंबाखु , गुटख्याची पुडी आणून देणारी मुले घरच्यांना कधी पुडी मागायला लागतील हेही कळणार नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होवून पुढिल धोका ओळखत अशा कामांपासून मुलांना हातभर लांबच ठेवलेले अधिक चांगले.

गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा