लेख - मोहर फुलला

 लेख - मोहर फुलला

शिक्षण ही मुख्यता बहुध्रृवीय क्रिया आहे. विद्यार्थी शाळा, परीसर, समाज, शेजार, घरातून सतत काहीना काही शिकत असतो. शिकण्याच्या या प्रक्रियेमध्ये शाळा हा महत्वाचा घटक आहे. शाळेतील शिक्षक - विद्यार्थी या दोन ध्रृवांदरम्यान सतत आंतरक्रिया घडत असते. हि प्रक्रिया अविरत सुरू असते. या प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर परस्पर कमीअधिक परीणाम होत असतो. यात शिक्षक हा सुलभकाची भुमिका वठवत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत ऊर्जेला योग्य दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत असतो. अशा दिशादर्शनातूनच भावी पिढीचे सुजाण नागरीक, कलावंत, शास्रज्ञ, खेळाडु, विचारवंत, लेखक, कवी, साहित्यिक घडत असतात. अशाच एका प्रवासाचा मांडलेला हा प्रपंच.

माझी मे २०१८ साली कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या विद्यामंदिर उंड्री (ता. पन्हाळा) या शाळेत बदली झाली. पूर्वीच्या द्विशिक्षकी शाळेपेक्षा येथील वातावरण निराळे होते. शिक्षक संख्या आणि विद्यार्थी संख्याही मोठी. अशा शाळेत काम करताना सुरूवातीला वातावरणाशी जुळवून घ्यावं लागलं. जूनमध्ये शाळेची घंटा वाजली. सारे सोपस्कार पार पाडत वर्ग सुरू झाले. २६ जून- राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करताना शाळेच्या या पहिल्याच कार्यक्रमामध्ये मला एका विद्यार्थीनीची ओळख झाली. या कार्यक्रमामध्ये इयत्ता ६ वीत शिकणार्‍या कु. वैष्णवी युवराज सुतार या विद्यार्थीनीने राजर्षी शाहु महाराजांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतात तिने "शाहु राजा" ही कविता सादर केली. कविता अशी होती.

लोककल्याणासाठी देह तुम्ही वाहिला
तुमच्यामध्ये आम्ही खरा राजा पाहिला

माझी कोल्हापूर भूमी तुम्हीच पावन केली
तुमच्या पदस्पर्शाने ही नगरी महान झाली

सार्‍यापुढे आदर्श राजे तुम्ही ठरला
पण दु:ख आहे लवकरच आम्हाला सोडून गेला

असे हे राजे कोल्हापूर भूमीमध्ये आले
सार्‍यांचे जीवन समृद्ध करून गेले

आशा आहे मनी असा शाहू राजा पुन्हा पुन्हा जन्मावा
या कोल्हापूर नगरीला आणखी उजाळा द्यावा

सहावीच्या विद्यार्थीनीच्या या कवितेने मी प्रभावित झालो.
कार्यक्रमानंतर सहकार्‍यांशी अनौपचारीक चर्चा करताना ही कविता तिची स्वलिखीत असल्याचे समजले. उत्सुकतेपोटी दुसर्‍या दिवशी मी तिला कवितांची वही आणायला सागितली. तिने कवितांची वही माझ्या पुढ्यात ठेवली. मी वही चाळायला लागलो. त्यात आठ दहा कविता, काही कच्च्या तर काही पक्क्या स्वरूपात होत्या. त्यामुळे मी प्रथम तिला पक्क्या कवितांसाठी वेगळी डायरी घालायला लावली. त्यानंतर वहीत कच्चे काम करून पक्की झालेली कविता ती डायरीमध्ये लिहायला लागली.

थोड्याच दिवसात तिने सार्‍या कविता डायरीमध्ये लिहून काढल्या. तिच्या डायरीतील कविता वाचताना, तिच्या काव्य प्रतिभेची ओळख मला झाली. तेव्हाच मी तिच्या कवितेला खतपाणी घालण्याचे ठरवले. त्यावेळपासून ती तिने लिहिलेली प्रत्येक कविता मला दाखवू लागली. मी त्या वाचून सहकार्‍यांशी चर्चा करून गरजेनुसार बदल सुचवत गेलो. लेखनाची तिची ओढ आणि सातत्य कमालीचे असल्याचे मला तिच्या कवितेतून जाणवले. आपल्या सभोवतीचा परीसर, गाव, शेती, डोंगर, शाळा यासोबतच सभोवती घडणारे छोटे छोटे प्रसंग घटना यांचे संवेदनशीलपणे टिपण करत, ते आपल्या कवितेतून रेखाटण्याचे तिचे कौशल्य कमालीचे आहे. ते तिच्या कवितेतून मला जाणवले. हळूहळू तिच्या कच्च्या कविता पक्क्या कवितांत रूपांतर होऊ लागल्या. याकामी माझ्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक सुतारसर, तिचे वर्गशिक्षक संजय पाटीलसर, शिक्षक दत्तात्रय गुरवसर, राहुल खलसेसर, श्याम गायकवाडसर, सुशांत कुंभारसर यांचे मोलाचे सहकार्य मिळत गेले.

यादरम्यान मी तिची  "पाऊस" ही कविता किशोर मासिकाला पाठवली. ही कविता किशोरच्या जुलै २०१९ च्या अंकात प्रकाशित झाली. किशोरमध्ये पहिल्यांदाच पाठवलेली तिची कविता प्रकाशित झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले. यामुळे तिलाही आनंद झाला. यातून तिचा आत्मविश्वास वाढला. आता ती कवितेकडे अधिक गांभिर्याने बघू लागली. पुढे आमच्या चव्हाणवाडी केंद्रातील बोरगाव शाळेतील कु. अंकिता कांबळे या सातवीत शिकणार्‍या विद्यार्थीनीचा वर्षभरापूर्वी प्रकाशित झालेला "श्रावण झुला" हा कविता संग्रह माझ्या हाती पडला. मी तो वैष्णवीला वाचायला दिला. त्यावेळेपासून तिलाही आपला स्वत:चा काव्यसंग्रह असावा असे वाटू लागले. पुढे दैनिक सकाळला मी तिची "बालपण" ही कविता पाठवली. सकाळने ती "बालमित्र" या लहानमुलांसाठीच्या त्यांच्या पुरवणीमध्ये प्रकाशित केली. अशीच ज्ञानयात्री मासिकाने तिची "बाबा" ही कविता सप्टेंबर २०१९ च्या अंकात प्रकाशित केली. या सर्वाचा परीपाक वैष्णवीच्या कविता बहरण्यात झाला. तिच्या प्रकाशित झालेल्या कविता बघून इतर मुले मुलीही लिहायचा प्रयत्न करू लागले.

वैष्णवीचे लेखन हळुहळु सुरू असताना तिला स्वत:चा काव्यसंग्रह सारखा खुणावत होता. एकदा तिच्या कविता मी  ह्रदय प्रकाशनचे प्रकाशक,लेखक चंद्रकांत निकाडेसर यांना दाखवल्या. त्यांनाही त्या कविता आवडल्या. वैष्णवीच्या कविता प्रकाशित करण्यासारख्या असल्याची पोचपावती मिळाल्यावर आर्थिक प्रश्न उभा राहीला. परंतु आपल्या मुलीची कवितेतील आवड आणि प्रगती बघून तिचे पालकही आर्थिक भार उचलण्यास तयार झाले. यामुळे काव्यसंग्रहाच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली.

नवोदित लेखकांना, त्यातही खासकरून विद्यार्थ्यांना नेहमीच बळ देणारे साहित्यिक चंद्रकांत निकाडेसर यांची भेट घेऊन त्यांनीच त्यांच्या ह्रदय प्रकाशनाने पुस्तकाची जबाबदारी स्विकारावी अशी आम्ही विनंती केली. निकाडेसरांनी ती लगेच स्विकारली. लिहित्या हाताला बळ देण्यात सदैव पुढे असणारे प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. सुरेश सावंतसर यांनी या कविता संग्रहाची पाठराखण केली. राज्य शासनाचा पुरस्कार विजेते साहित्यिक डाॅ. श्रीकांत पाटील यांनी प्रस्तावना दिली असून ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले तसेच कोल्हापूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. मुखपृष्ठ आणि अंतर्गत चित्रे चित्रकार बाळ पोतदार यांनी रेखाटत आमचा उत्साह द्विगुणीत केला. शेवटी प्रकाशन प्रक्रियेचे सारे सोपस्कार पार पाडत पुस्तक तयार होऊन प्रसिद्ध कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांच्याहस्ते पुस्तक प्रकाशित झाले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशादर्शन केल्यास विद्यार्थी आपल्या कलेचं चीज करतात याचाच प्रत्यय यातून आला.

- गुलाब रमेश बिसेन (अध्यापक)
शाळा - विद्यामंदिर उंड्री , पो. घोटवडे , ता. पन्हाळा
जि. कोल्हापूर  416230
मो. नं. 9404235191

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा