सृजनशाळा : सृजनशिलतेने झपाटलेल्या एका शिक्षकाचा उपक्रमकोश
सृजनशाळा : सृजनशिलतेने झपाटलेल्या एका शिक्षकाचा उपक्रमकोश
लेखक - चंद्रकांत निकाडे
एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची एक नवी पिढी दाखल झाली आणि प्राथमिक शाळांतून चैतन्याचे वारे वाहू लागले. खर्या अर्थाने आनंददायी शिक्षणाची पहाट उगवली. पाठ्यक्रमाबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी विकासाचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेला. आजतागायत हा आलेख प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे.
पन्हाळा तालुका तसा कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी विभागात मोडणारा भाग. बहुतेक सर्व गावे आणि शाळा दुर्गम प्रकारात मोडणार्या. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक दिग्गज आहेत. राजकिय पटलावर आपल्या कर्तृत्वाने विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे नेतेही आहेत. बेभरवशाच्या शेती या एकमेव उद्योगाला उत्तम पर्याय म्हणून शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी या तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना लाभली आहे.
अशा परिस्थितीत गोंदीया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सितेपार गावातून सेवेच्या निमित्ताने एक युवक पन्हाळा तालुक्यात दाखल झाला. बादेवाडी नावाच्या दुर्गम द्विशिक्षकी शाळेत शिक्षकी पेशा हे व्रत समजून ज्ञानदानाचे पवित्र कार्य मनोभावे करणारा एक शिक्षक अशी ख्याती प्राप्तकर्ता झाला.
विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी, त्यांच्या मनात अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी, मुलांच्या व पालकांच्या अडी-अडचणी ओळखून त्या सोडविण्यासाठी, अनेकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी, मुलांच्या अभिव्यक्तिसाठी, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आपल्या सृजनशील मनातील प्रयोगांची प्रात्यक्षिके करत राहीला. विद्यार्थ्यांबरोबरच शाळेच्या भौतिक विकासात भर घालत राहिला. समाजभान जोपासण्यासाठी उपक्रम करता करता इथलाच होऊन गेला.
मिळालेल्या यशाने हुरकून न जाता आपण राबविलेल्या कृति कार्यक्रमांची संगतवार मांडणी करून धडपडणार्या शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या उपक्रमांचे तपशिलवार लेखन करत राहिला. शिक्षण विषयाला वाहिलेल्या शासकिय- बागर शासकिय नियतकालीकांतून या उपक्रमांची प्रसिद्धी झाली. तरीही एका विशिष्ट चौकटीत हे उपक्रम राहू नयेत. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व नव्याने रूजू होणार्या शिक्षक बांधवांना आश्वासक दिशा मिळावी या हेतूने "सृजनशाळा" या पुस्तकाच्या निर्मितीकडे वळला.
सृजनशाळेचे केंद्रस्थान नवा शिक्षक असला तरी विद्यार्थी विकासाची अनेक वलये या पुस्तकाला लाभली आहेत. आपल्या उपक्रमाची मांडणी करत असताना त्यांनी त्यांची फलश्रुती सर्वांसमोर मांडली आहेच, शिवाय या उपक्रमांमधून आणखी कोण कोणत्या नवकल्पना साकार करता येतील याची पुस्तीही जोडली आहे.
शाळेतील परिपाठ अनोखा आकर्षक करण्यापासून ते शिवार भेटीपर्यंतचे उपक्रम राबवून भिंतीचे कुंपण ओलांडण्याचे धाडसी काम त्यांनी केल्याचे या उपक्रमांतून दिसून येते.
आपल्या विविध उपक्रमांतील नाविण्यपूर्ण अशा एकसष्ट उपक्रमांची भेट या पुस्तकांतून त्यांनी देण्याचा प्रामाणिक व सद्हेतूपूर्ण प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्यांची वैयक्तिक गुणवत्ता सुधारणारे हस्ताक्षरवीर, शब्दवीर, मनाचा कप्पा, मी चित्रकार, गीतमंच, योगाभ्यास असे एकापेक्षा एक उत्तम असे उपक्रम या पुस्तकात वाचावयास मिळतात. मुलांच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी स्कूलशाॅप, थुंकी मुक्त पाटी, पारंपारिक खेळ, पाणपोई, आरोग्य संपन्न शाळा, बचत बॅंक, अभ्यासिका, स्क्रॅप बुक, वर्तमानपत्राचा शैक्षणिक वापर असे कल्पक उपक्रम राबवून इतरांसमोर विस्तृतपणे उद्घृत करण्याचे काम केले आहे.
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा पूर्ततेसाठी व अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी राबविलेल्या बाल चित्रपट महोत्सव, लेखक-कवी आपल्या भेटीला, शालेय मंत्रिमंडळ, आम्ही व्यवहारज्ञानी, पत्रसंवाद, आठवडा बाजार, क्षेत्रभेट, मैत्री पुस्तकांशी, तज्ञांची व्याख्याने या उपक्रमांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.
पालक व समाजाशी असलेले विद्यार्थ्यांचे नाते दृढ व्हावे. त्यांच्यात विविध जाणिवा निर्माण व्हाव्यात यासाठी वाढदिवस फंड, हरवले-सापडले, सीडबॅंक, आॅक्सिजनपार्क, रोपवाटिका, परसबाग, कृषिप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद मेळावा, प्रवेशोत्सव असे उपक्रम घेऊन कृतज्ञतेचा वसा जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना सिद्ध केल्याचे जाणवते.
विद्यार्थी विकासाबरोबरच शिक्षक व्यक्तिमत्व समृद्धीसाठी सृजनशाळा पुस्तकातील सर्वच उपक्रम उपयुक्त आहेत.
"आपणासरिखे करिती तात्काळ
नही काळवेळ तयालागी ।"
या संतोक्तीस अनुसरून झपाटून काम केल्याची पोहचपावती या उपक्रमलेखनातून स्पष्ट होते.
वास्तवाचा आधार व त्याला कृतिशीलतेची जोड असल्यामुळे गुलाब बिसेन यांची "सृजनशाळा" शैक्षणिक साहित्यात हस्तपुस्तिकेइतके काम नक्कीच करेल हा विश्वास वाटतो.
बोलके मुखपृष्ठ, लेखनातील अचुकता व नेमकेपणा, उपक्रमांसोबत असलेली पूरक छायाचित्रे व रेखाचित्रे, स्वत:च्या अंगभूत गुणांचा उपयोग, यातून विद्यार्थी- पालक- समाजाप्रती आपली शिक्षक म्हणून असलेली बांधिलकी अभिव्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
चागल्या पुस्तकातून, त्यांच्या वाचनातून चांगले विचार आपल्याला मिळतात; त्यामुळे जगात पुस्तकासारखा दुसरा चांगला मित्र नाही असे म्हणणार्या बिसेन सरांनी "उत्तम ते दुसर्या द्यावे" हा हेतू आपल्या पुस्तकातून साध्य केला आहे.
मुद्रित शोधनातील किरकोळ अपवाद वगळून, उपक्रमांसोबत राष्ट्रीय मूल्ये, गाभा घटक, जीवन कौशल्ये यांची हेतूपूर्वक मांडणी केल्यास एक उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करण्यास हरकत नाही.
ग्रंथाचे नाव - सृजनशाळा
लेखक - गुलाब बिसेन
प्रकाशक - राजर्षी फौंडेशन, कोडोली
किंमत - १७० रूपये
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा