नव शिक्षक घडवताना…...
नव शिक्षक घडवताना…...
सध्याचा काळ हा अनेक अंगाने संक्रमणाचा काळ आहे. या काळामध्ये रोज नवे घडत आहे. या नवे घडण्याची गतीही अफाट वेगाने वाढते आहे. काल ज्या संकल्पना आपले मूळ रोवून खांबाप्रमाणे घट्ट उभ्या होत्या, त्या आज उन्मळून पडल्या आहेत. जग रोज बदलतंय. या जगात रोज नवं घडत आहे. विद्यार्थी शिक्षक यांच्यातील नातं या तंत्रज्ञानाच्या काळात बदलत चाललेलं आहे. वर्गातील विद्यार्थी हा केवळ शिक्षकाकडूनच शिकत नाही, तर त्याच्या सभोवती असलेलं निसर्गरुपी पुस्तकही त्याला शिकवतच आहे. सोबतच इंटरनेटचं मायाजाल त्याला नवनवे रोजच काही ना काही शिकवत आहे. अशा विद्यार्थ्यांना रोजच सामोरे जाणारा शिक्षकही अपडेट असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी जुनी परंपरागत शिक्षणाची पांघरलेली झूल उतरून नव तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज झाली आहे.
अशा दिवसेंदिवस आव्हानात्मक ठरत चाललेल्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी नव शिक्षक घडवणे गरजेचे ठरते. मग तो घडेल तरी कसा? यासाठी दोन पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे ठरेल.
व्यक्तिगत आणि संस्थात्मक अशा या दोन पातळ्या आहेत या दोन पातळ्या आता विस्ताराने बघू.
1) व्यक्तिगत पातळीवरील प्रयत्न -
जेव्हा एखादी व्यक्ती शिक्षकी पेशा निवडतो, तेव्हा त्याने दोन वर्षाचे प्रशिक्षण घेतले आणि त्याच्यामध्ये व्यवसायाशी संबंधित सर्वच पात्रता आल्या असे होत नाही. सोबत जसा काळ बदलतो तसे सर्वच व्यवसायाच्या गरजाही बदलत जातात. त्यामुळे व्यवसायाची गरज बघता शिक्षकाने तरी व्यक्तिगत पातळीवर आपले ज्ञान अपडेट ठेवणे गरजेचे ठरते. यासाठी तो विविध साधनांचा वापर करू शकतो. शिक्षकाने रोज नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. नव्हे तर तो रोज नवनवीन गोष्टी शिकणाराच असावा. त्याचे वाचन चौफेर असावे. तो शैक्षणिक साधनांच्या बाबतीत संपन्न असावा. त्याच्याजवळ स्वतःचे संदर्भग्रंथ, संगणक, पेन ड्राईव्ह असावेत, शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांसाठी देण्याची त्यांची मनापासून तयारी हवी.
नव शिक्षकाने स्वतःला काळाच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी शिक्षक म्हणून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी विविध शिबिरामध्ये सहभागी व्हावे. सोबतच संशोधन, लेखन, वाचन, पर्यटन यावरही वेळ आणि पैसा त्यांनी खर्च करावा. कालमान हे नव शिक्षकाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे तो संगणक साक्षर असावा. परिधान केला जाणारा पोशाख नेटका असावा. व्यक्तीमत्वापेक्षा वृत्तीविकास जपणारा शिक्षक असावा. रोजचे शिक्षण चैतन्यमय बनवण्याची कला त्याने प्रयत्नपुर्वक अवगत करावी. त्याने धर्म, जात, पंथ, पक्ष निरपेक्षता अंगी बनवावी. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानात न गुरफटता प्राप्त ज्ञानाचे उपयोजन करायला त्याने शिकवं. त्याने विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व्हावं.
सध्याच्या जगात विद्यार्थी व शिक्षकांमधील दरी रुंदावताना दिसते. वर्तमानात मुले संगणक, इंटरनेट, मोबाईल, आयपॅड, व्हिडिओ गेम्स वापरत आहेत. त्यामुळे नव शिक्षक हा या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणारा असावा. यासाठी मुलांच्या दृष्टीने वरील साधनांचा अभ्यास आणि वापर करणारा असावा. आताची मूले मग ती ग्रामीण असो वा शहरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड उत्सुक दिसतात. मुळात त्याचा जन्मच या साधनांच्या सहवासात झाला आहे. बाळ जन्माला आल्या-आल्या मोबाईल वर त्याचा फोटो झळकतोय. रांगण्याच्या वयापासून तो मोबाईल वापरतो. या मुलांना वाचता येत नसलं तरी मोबाईलवर व्हॉईस कमांड देऊन त्यांना हवं ते शोधतात. त्यामानाने सध्याच्या शिक्षकांची पिढी ही इंटरनेट पूर्वकाळात जन्मलेली पिढी आहे. तिचे वर्णन प्रि- इंटरनेट जनरेशन असे केले जाते. संगणक क्रांतीपूर्व जन्मलेल्या शिक्षकाला आत्ताच्या डिजिटल काळात जन्मलेल्या मुलांना हाताळायचं असल्याने नव शिक्षकाने ज्ञानपिपासू असले पाहिजे.
आता ऑनलाईन शिक्षणाचा काळ आलेला आहे. इंटरनेटवर अभ्यासक्रम, घटक चाचण्या, परीक्षा, वेळापत्रक, प्रमाणपत्रे सारे असते. त्यामुळे पूर्वीपेक्षा शिक्षकाच्या भूमिकेत आता अमुलाग्र बदल झाला आहे. पूर्वी शिक्षकांनी शिकवायचे, मुलांनी ऐकायचे. गुरुजींनी बोललेलेच खरे मानले जायचे. परंतु आत्ताचा विद्यार्थी तसा राहिलेला नाही. तो प्रश्न विचारतो. दिलेले उत्तर पडताळून पाहतो. उत्तर खरे की खोटे हे तोच ठरवतो. त्यामुळे शिक्षकाची भूमिका बदलून तो आता सुलभक झालेला आहे. त्याचे कार्य मुलांना प्रेरणा देणे, प्रोत्साहित करणे, मूल्यांची रुजवणूक करणे, जिज्ञासा निर्माण करणे या भूमिका त्याला पार पाडाव्या लागत असल्याने त्यादृष्टीने नव शिक्षकांनी स्वतःची तयारी करून घेणे अगत्याचे आहे.
नव शिक्षक हा शिकवणाऱ्या पेक्षा शिकणारा असावा. घड्याळाचे काटे कधीच उलटे फिरत नाहीत. बदल हा सृष्टीचा नियमच आहे. जो स्वतःला बदलतो तोच टिकतो. यासाठी डायनासोर या प्राण्याचे उदाहरण आपल्याला डोळ्यापुढे ठेवता येईल. भारत देशात बालशिक्षण अजूनही उपेक्षितच आहे. परिस्थिती बदलायची असेल तर ती शिक्षकच बदलू शकतो. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला बदलणे गरजेचे आहे. काळ बदलतोय तसे जुनाट पद्धतीही गळून पडत आहेत. अनेक ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी, ऑनलाइन प्रवेश, ऑनलाइन परीक्षा, व्हर्च्युअल क्लासरूम ही नवीन साधने आपल्यापुढे आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत ही नवनवीन साधने आणि त्यांची तंत्रे नव शिक्षकांनी आत्मसात करणे अटळ आहे. अन्यथा थांबला तो संपला.
नव शिक्षकांच्या हातामध्ये मोबाईल सारखे महत्त्वाचे साधन आहे. त्या साधनाचा उपयोग आपल्या अध्यापनात कसा करता येईल याचा त्यांनी अभ्यास करावा. शब्दकोश, इ बुक लीडर, कॉन्फरन्सिंग, रेडीओ, टी व्ही, शालेय मतदान, गृहपाठ देणे, ऑनलाइन परीक्षा घेणे, पालकांना सूचना देणे, भाषण ध्वनिमुद्रण, संवाद, फोटो काढणे इत्यादी शेकडो प्रकारची कामे कल्पकतेने मोबाईलच्या माध्यमातून नव शिक्षक करू शकतो. नव शिक्षकांने इंटरनेटच्या मायाजाळात नानाविध प्रकारची विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला उपयुक्त माहिती शोधून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. टायटन पैड सारख्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील विद्यार्थी आपली समस्या मांडू शकतो. त्यावर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील शिक्षक ती दूर करू शकतो. हा इंटरनेटचा मोफत शिकवणी वर्गच आहे अशा विविध संकेतस्थळांचा नवशिक्षकांनी अभ्यास करून ते आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा.
शिक्षक हा मुळातच ज्ञान साधक असतो. ज्ञानवहन आणि ज्ञानाची निर्मिती ही त्याची महत्वाची कामे आहेत. त्यामुळे नव शिक्षकाने ज्ञानरचनावादी पद्धतीने रोज नवे वाचन, नवे चिंतन, नवे मनन, नवीन संशोधन, नव लेखन केले पाहिजे. नव शिक्षकात उपक्रमशीलता असायला पाहिजे. शाळेच्या खोलीत शिकवण्याचे दिवस आता गेले. शिक्षण म्हणजे जगायला शिकवणे अशी शिक्षणाची नवीन व्याख्या रूढ होत आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना चाकोरीबाहेर जाऊन वर्गा बाहेरचे जग दाखवून खऱ्या अर्थाने जगायला बळ देणारे शिक्षण नव शिक्षकांनी देण्यासाठी उपक्रमशीलतेची जोपासना त्यांने केली पाहिजे. नव शिक्षकाने स्वत:ला अंकीय साक्षर करणे गरजेचे आहे. अंकीय साक्षरता म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, माहिती तंत्रज्ञान व संपर्कसाधनांचे ज्ञान व ज्ञानाच्या उपयोजनाची क्षमता, नव शिक्षकांनी ब्लॉगचा वापर करून शंका मांडणे, सोडवणे, सल्ला देणे, विस्तार करणे, प्रचार प्रसार करणे इत्यादी गोष्टी कराव्यात. यु ट्युब, ऍनिमल प्लॅनेट, गुगल सर्च युट्युब चॅनेल इत्यादी साधनांचा प्रभावी वापर करून भाषा, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र इत्यादी विषय विद्यार्थ्यांना सोपे करून सांगावेत नव तंत्रज्ञानाच्या या काळात नव शिक्षकाला मिळालेला तो खजिनाच आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करावा.
2) संस्थात्मक पातळीवरील प्रयत्न -
नवीन शिक्षक घडवताना नव शिक्षकाचे स्वतःचे प्रयत्न जेवढे महत्त्वाचे आहेत, त्याच सोबत या नव शिक्षकांना प्रशिक्षित करणाऱ्या विद्यालयांच्या (डीएड, बीएड, एम.एड , एम.पी. एड. इत्यादी) अभ्यासक्रम आणि रचना या माध्यमातून नव शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्न होणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या देशामध्ये खास करून महाराष्ट्रात शिक्षकांना प्रशिक्षित करणाऱ्या विद्यालयांची खैरात वाटण्यात आली. अगदी गल्लीबोळात अशा विद्यालयांची रेलचेल सुरू झाली. ही विद्यालये कागदोपत्री पदवी मिळवण्याचे साधनरूपात प्रसिद्धीसही आलेत. याचा परिणाम शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर निश्चित झाला. आता शासनाने सन २०१५ -१६ या वर्षात भारतीय शिक्षकांच्या सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल करून नव शिक्षक घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे नव शिक्षकांना प्रशिक्षित करणाऱ्या विद्यालयांमध्ये भौतिक सुविधा साधने, प्रशिक्षक प्राध्यापकांचे प्रशिक्षण, प्राध्यापकांची व्यावसायिक पात्रता उंचावणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नव शिक्षक हा तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारा असल्याने त्याला संगणक साक्षर ते सोबतच इंटरनेट साक्षरही असणे गरजेचे असल्याने शिक्षक प्रशिक्षणाच्या दरम्यान संगणक आणि इंटरनेटची सुविधा त्यांना मिळणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार मूलभूत अभ्यासक्रम अध्यापन पद्धती, शिक्षक जाणिवांचा विकास यामध्ये सुयोग्य बदल करून नव शिक्षक घडवणे हे काम संस्थात्मक पातळीवर होणे गरजेचे आहे.
देशातील पूर्वप्राथमिक पासून ते विद्यापीठ स्तरापर्यंतच्या विद्यमान शिक्षक, त्यांचे शिकणे, शिकवणे, चारित्र्य, आचार –विचार, समाजमनातील शिक्षकाची ढासळती प्रतिमा या सर्व पार्श्वभूमीवर नव बदलांना अनन्य साधारण महत्व आहे. या नव बदलांच्या माध्यमातून नव शिक्षक घडवण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने भारत सरकारने २०१५-१६ च्या सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये शिक्षकाचे व्यक्तिमत्व व अध्यापन समृद्धी, भाषा प्रावीण्य, माहिती व संपर्क साधन तंत्रज्ञानाचा अध्यापनात कुशल वापर, शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य (विद्यार्थी व शिक्षक दोघांचेही) कला व सौंदर्यदृष्टी विकास, विविध ज्ञानसाधनांचा वापर (उदा. प्रयोगशाळा, ग्रंथालय, शैक्षणिक साधने यांना प्रशिक्षणात विशेष महत्त्व असणार आहे) सोबतच पर्यावरणीय जागृती, लिंगभेदातीतता, शांतता, विशेष विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची तत्परता, वर्गात प्रसंगोपात संबोधन याद्वारे शिक्षकाचे व्यक्तिमत्व संवेदनशील, समाजशील व समाज सहभागात सक्रिय राहील यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार असल्याने नव शिक्षक घडवण्याच्या दृष्टीने हे क्रांतीकारक पाऊल ठरणार आहे.
गुलाब बिसेन ( अध्यापक)
वि.मं.उंड्री ता.पन्हाळा जि.कोल्हापूर
मोबाईल ९४०४२३५१९१
ई-मेल gulab0506@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा