तरूणांच्या स्वप्नांना हवे दातृत्वाचे बळ
तरूणांच्या स्वप्नांना हवे दातृत्वाचे बळ
देश सेवेचा ध्यास घेवून सैन्यात जाण्यासाठी सज्ज असलेले काही युवक एकत्र येतात. मैदानावर कुठल्याही सोयी सुविधा नसताना घाम गाळून मेहनत करतात. सुविधांची वाणवा असताना इतरांना प्रेरित करून नित्याने सराव सुरू ठेवतात. बेरोजगार असतानाही पदरमोड करून मैदानावर स्वखर्चाने तुटपुंजे का असेना साधनं बसवतात. एक एक करत युवकांना जोडतात. "एक एका साह्य करू , अवघे धरू सुपंथ" या उक्तिप्रमाने हे युवक हातात हात घालून एकमेकांना प्रेरणा देत आहेत.
हि गोष्ट आहे , गोंदिया जिल्ह्याच्या पुर्व टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सितेपार (ता. तिरोडा) आणि परिसराती गावांतील तरूणांची. देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याचे स्वप्न बाळगणारे हे तरूण. सितेपार , खेडेपार परिसरातील कुणाल रहांगडाले , समित पटले , मुकुल झंझाड , संगम रहांगडाले , मनोज बघेले , आकाश कटरे , खोमेश ठाकरे , जितेंद्र माहुरले , पिंटु पटले , अक्षय रहांगडाले , सुहास हजारे , सोपान तुमसरे , रविंद्र पारधी , अमित पडोळे , शुभम रहांगडाले , संस्कार माहुरले , विकी रहांगडाले या तरूणांनी खेडेपार येथिल मैदानावर सरावाला सुरूवात केली. या तरूणांना बघुन हळुहळु इतर तरूणही प्रेरित झाले. सुरूवातीला पंधरा ते वीसच्या घरात असणारी ही संख्या बघता बघता शंभराच्या घरात पोहचली.
वाढती बेरोजगारी आणि उच्च शिक्षणाची संधी यांच्या व्यस्त समीकरणाने मेटाकुटीला आलेल्या ग्रामिण तरूणाला सैन्य भरतीच जवळची वाटु लागते. यासाठी हे तरूण घाम गाळत आहेत. या तरूणांना मैदान जरी उपलब्ध असले तरी इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मैदानावर शारीरिक कसरतीसाठी आवश्यक असणार्या साधनांची कमतरता नेहमीच भासत असते. यासाठी या बेरोजगार तरूणांनी पदरमोड करून स्वखर्चाने तुटपुंज्या का असेना साहित्याची खरेदी करून ते मैदानामध्ये बसवलेले आहेत.
तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने युवकांचा सराव सध्या सुरू आहे. यात सितेपार , खेडेपार , सोनेखारी , नवेझरी , लोणारा , करडी इत्यादी पंचक्रोशितील शंभराहुन अधिक युवक दररोज सायकलने मैदानावर येवून सराव करत आहेत. परिसरात व्यायामशाळा नसल्याने या तरूणांची मोठीच अडचण होत आहे. देशसेवा करण्याची संधी मिळावी या ध्येयाने प्रेरित झालेल्या या तरूणांना मैदानावर सरावासाठी लागणार्या साधनांची गरज आहे. सराव करणार्यांच्या तुलनेत साधनांची उपलब्धता कमी असल्याने या युवकांना समाजाच्या दातृत्वाची खरी गरज आहे.
लेखक - गुलाब बिसेन , सितेपार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा