बालमनाची उत्कट व प्रगल्भ अभिव्यक्ती – ‘ मोहर’
बालमनाची उत्कट व प्रगल्भ अभिव्यक्ती – ‘ मोहर’
मानवी मनाच्या अथांग सागरात उमटणाऱ्या नानाविध भावना आणि कल्पना समर्थपणे व्यक्त करण्याची प्रचंड ताकत काव्यामध्ये आहे, हे वादातीत आहे. तथापि वरवर सोपा वाटणारा हा साहित्यप्रकार लीलया हाताळण्यासाठी उपजतच संवेदनशील मन आणि उच्चकोटीची प्रगल्भता हवी हेही तितकेच खरे! कवितेचे हे शिवधनुष्य पेलण्याची ईश्वरदत्त देणगी मोजक्याच काही लोकांना प्राप्त असते.
बालपण हे खरेतर स्वच्छंदी फुलपाखरासारखे या फुलावरून त्या फुलावर खेळण्या- बागडण्याचे वय ; पण या वयातही शब्दांच्या जादुई दुनियेत अगदी सहजपणे विहरणारी काही दुर्मिळ पाखरेही असतात! कु वैष्णवी युवराज सुतार हे नाव त्यांपैकीच एक. उंड्री ( ता पन्हाळा, जि. कोल्हापूर) सारख्या एका छोट्याशा गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेत सातव्या इयत्तेत शिकणारी ही चिमुकली. पाचवीत असताना तिला शिकवणारे शिपुगडे सर कविता लिहितात म्हणून वैष्णवी ‘बालपण’ नावाची कविता लिहिते. परंतु तिच्या कवितारुपी वेलीला खऱ्या अर्थाने ‘मोहर’ फुटतो तो ती सहावीत आल्यावर. श्री गुलाब बिसेन गुरुजी नावाच्या भक्कम वृक्षाच्या आधाराने ती आणखीन मोहरत जाते. वैष्णवीच्या आई बाबांचं प्रोत्साहन आणि संस्कार तिच्यातील प्रतिभेला जणू खतपाणी घालतात.अन साकारतो ‘मोहर’ हा कविता संग्रह.
‘हृदय प्रकाशन पोहाळे’ यांनी वैष्णवी सुतार या बालकवयित्रीचा ‘मोहर’ हा काव्यसंग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे. एकूण ४४ कवितांच्या या संग्रहातील कविता वाचकाला अंतर्मुख करतात. खरेतर बालकविता ही विशिष्ट चौकटीत अडकलेली असतानाच वैष्णवीने मात्र चाकोरीबाहेरील विषयांवर काव्यलेखन करून तिच्या वैचारिक परिपक्वतेचेच दर्शन घडविले आहे. शाळा, गाव, पाऊस, डोंगर, आई – बाबा यासारख्या बालमनाशी निगडीत विषयांबरोबरच जीवन, ध्येय ,वेळ, माणूसपण, नातेसंबंध, लहरी निसर्ग, विज्ञान , आधुनिक जीवनशैली व त्याचे परिणाम यांसारख्या गंभीर आणि वैचारिक विषयांवर सुद्धा तिची कविता उत्तम भाष्य करते. अपयशाने खचून निराश होणाऱ्यांना उद्देशून ती म्हणते –
‘ प्रत्येकाच्या जीवनामध्ये
कधीतरी येतं अपयश
मात्र प्रयत्नांनी होतं
साकार आपलं यश’
साध्या सोप्या शब्दांत मार्मिक गोष्ट सांगण्याचे या वयातील तिचे कसब अचंबित करणारे आहे.त्यासाठी योग्य चपखल शब्दांची केलेली गुंफण तिच्या भविष्यातील काव्यप्रवासाची प्रचीती देते. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.’ मनुष्याच्या जीवनामध्ये निर्भेळ आनंद देणारी अवस्था म्हणजे बाल्यावस्था! हे बालपण हरवल्याची खंत तिच्या मनाला जाणवते.
‘बालपण असतेच वेगळे
सर्वांना रमविणारे
त्याच्याविषयी काय बोलू
शब्दच न फुटणारे’
ग्रामीण संस्कृती मध्ये एकत्र कुटुंबाचे आणि कुटुंबातील घटकांचे महत्व तिच्या बालमनाला ठाऊक आहे. तिला आपल्या आईवडिलांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. तितकेच प्रेम तिला आपल्या आजीबद्दल आहे. मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता निर्व्याज प्रेम देणाऱ्या आपल्या बाबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणते..
‘मुलगी असूनसुद्धा
मुलग्याप्रमाणे वागवलं
काही मागायच्या आधी
सारं काही आणून दिलं.’
आईबद्दल लिहिताना ती गहिवरून जाते. मोठी होऊन तिला सुखाचे दिवस दाखविण्याचे जणू वचनच देते.
‘नेहमी तुझ्या चरणी
व्हावे वाटते लीन
ठेवते तुझ्यापायी
सुखाचे गं दिन’
कौटुंबिक नातेसंबंध आणि जिव्हाळा याबद्दल लिहिताना तिचे शब्द भावनांनी ओथंबून जातात. तिच्यामध्ये कवितेचा अंकुर रुजविणाऱ्या तसेच तिला घडविणाऱ्या गुरुजनांबद्दलही तिला नितांत आदर आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता तिच्या काव्यामध्ये ठायी ठायी जाणवते. आपल्या कर्तृत्वाने एक दिवस गावाचे नाव करेन असे आत्मविश्वासाने आपल्या कवितेतून ती सांगते.
या सर्वांबरोबरच तिच्या बालमनाशी निगडीत असे अनेकविध विषय तिने आपल्या कवितेतून मांडले आहेत. सहजसुंदर बाळबोध भाषेमुळे तिच्या कवितेचे सौंदर्य आणखी खुलते. आपल्या आजूबाजूला पाहिलेले प्रसंग, व्यक्ती, प्रसिद्ध ठिकाणे, वास्तू तिच्या कवितेतून शब्दरूपात प्रकटतात. त्यातून तिची चौफेर निरीक्षण क्षमता व चिंतनशील वृत्ती दिसून येते. वर्तमानकाळाबरोबर भूतकाळात तिचे मन रमते आणि भविष्याचाही वेध घेते. शब्दांची अचूक निवड तिच्या सखोल अवांतर वाचनाची व प्रगल्भतेची साक्ष देते, शब्दावरील निस्सीम प्रेमाची प्रचीती देते.
सामाजिक , सांस्कृतिक व अध्यात्मिक प्रश्नांची तिला उत्तम जाण आहे. जीवनातील विविध प्रश्नांची कोंडी ती आपल्या कवितेतून फोडते. निसर्गाच्या लहरीपणाचा माणसाला तसेच एकंदरीत पर्यावरणाला कसा फटका बसतो याचे भीषण दर्शन ‘महापूर ’ सारख्या कवितेतून होते.
‘पाऊस यायचा तसा आला
गोरगरीब दुःखात बुडाला
महापुराच्या विळख्यामध्ये
मानव तडफडू लागला.’
डिजिटल युगात स्मार्ट फोनचं सर्वांना लागलेले व्यसन व त्याचे दुष्परिणाम ‘ टिक टॉक’ कवितेत मांडले आहेत.जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची झालेली दयनीय अवस्था व त्याचे उपकार सांगायलाही ती विसरत नही. काव्यलेखनासाठी तिची विषयनिवड वाखाणण्याजोगी आहे. बहुतांश ठिकाणी दुसऱ्या व चौथ्या ओळींमध्ये यमक साधण्याचा प्रयत्न केला आहे. यमक जुळवताना एखाद्या कसलेल्या कविइतके कौशल्य तिच्या कवितेत नसेलही;पण तिने बालवयात केलेल्या या प्रयत्नांची उंची तिच्या भावी आयुष्यातील गगनभरारीची नांदीच म्हणावी लागेल.
छपाई व बांधणीच्या बाबतीत हृदय प्रकाशने कोणतीच उणीव राखलेली नाही. मुखपृष्ठ खूपच बोलके आणि अर्थपूर्ण असून काव्यसंग्रहाला दिलेले ‘मोहर’ हे नामाभिधान सार्थ ठरते. नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ सुरेश सावंत यांची कौतुकाची थाप मलपृष्ठावर वाचावयास मिळते. सोबतच ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले, कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल यांचे शुभेच्छारुपी आशीर्वाद लाभले आहेत. सदर काव्यसंग्रहास राष्ट्रपती व राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ श्रीकांत श्रीपती पाटील यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.
साहित्यिक वाटचालीतील तिचा हा पहिलावहिला प्रयत्न निश्चितच काव्यरसिकांच्या कौतुकास पात्र ठरेल यात शंकाच नाही.
पुस्तकाचे नाव – “मोहर’’
कवयित्री – वैष्णवी युवराज सुतार
प्रकाशक - हृदय प्रकाशन पोहाळे
पृष्ठे – ५६
मूल्य – ५० रु.
- विठ्ठल पाटील , मु.पो. पिशवी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर
मो. नं. +91 98607 90106
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा