झाडीपट्टि आणि शिंगाडा

##  झाडीपट्टि आणि शिंगाडा  ##

झाडीपट्टि...... महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील भंडारा , गोंदिया , चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसह नागपूरचा काहि भाग निसर्गाने समृद्ध असा हा भाग. वनसंपदेने नटलला हा भाग तलावांच्या विपुलतेमुळे  " तलावांचा प्रदेश " म्हणून ओळखला जातो. या तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते.

झाडीपट्टित दिवाळीपासून महिनाभर  " मंडई " हा खास उत्सव साजरा केला जातो. कष्टकर्‍यांचा श्रमपरिहार होवून त्यांच्यात कष्ट करण्याची नविन उर्जा निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतु. या मंडईमध्ये झाडीपट्टितील लोककलांचा जनु मेळाच भरतो. महिना दोन महिने गावागावात दंडार , जलसा , नाटक , तमाशा , नौटंकी ड्रामा या कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. मंडईनिमित्त गावे पाहुण्यापयांच्या गर्दिने फुलुन जातात. माहेरवासिन मुली आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत माहेरी काहिकाळ माहेरपण जगतात.

याच मंडईमध्ये खवय्यांच्या नजरा आपसुकच एका पदार्थाकडे वळतात. तो म्हणजे शिंगाडा. मंडईमध्ये शिंगाडा न खाणारा व्यक्ती शोधुनहि सापडणार नाही अशी या भागात शिंगाड्याची ख्याती आहे. चवीला गोडसर लागणारा काळ्या फोलाखालचा पांढरा शुभ्र शिंगाडा खवय्यांना आपल्याकडे खेचुन घेतो. दिवाळिच्या दिवसातच मिळणारा हा शिंगाडा खाण्याचा आनंद लहान थोरापासून सर्वच लुटतात. त्यामुळे शिंगाडा न खाणारी व्यक्ती झाडीपट्टित शोधुनही सापडणार नाही. मंडईव्यतिरिक्त बाजारात , हायवेवर  शिंगाडे विकणारी मंडळी आपली दुकाने थाटतात.

तृणवर्गीय वनस्पती असलेल्या शिंगाड्याला उकडुन खाल्ले जाते. कच्चा शिंगाडा हिरवा लालसर रंगाचा असतो. त्याला उकळल्यावर त्याच्या फोलाचा रंग काळा होतो. शिंगाड्याला दोन काटे असतात. काट्यांचा भाग कापून आतला पांढरा गर खाल्ला जातो. शिंगाडा हा गोडसर चवीचा आणि पौष्टिक असतो. विशिष्ट पद्धतिच्या अडकित्याने शिंगाड्याचे फोल कापले जाते. शिंगाडा हा उपवासाचा पदार्थ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखिचा असला तरी झाडीपट्टिएवढा इतरत्र खाल्ला जात नाही. शिंगाड्याच्या पिठापासून शिरा केला जातो.

या शिंगाड्याचे अनेक गुणकारी फायदेही आहेत. 

१)  दम्याच्या रुग्णांनी शिंगाडा खाणे उत्तम. यामुळे दम्यापासून आराम मिळतो.

२) मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यावर शिंगाडा फायदेशीर आहे.

३) शिंगाडा खाल्ल्याने पायाच्या तळव्यांच्या भेगा भरुन येतात. तसेच शरीराच्या एखाद्या भागावर सूज आल्यास त्यावर शिंगाड्याचा लेप लावल्यास फायदा होतो.

४) शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

५) गर्भवती महिलेंनी शिंगाडा खाल्ल्यास महिला आणि बाळ दोघांचे स्वास्थ्य चांगले राहते. तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो. शिंगाडा खाल्ल्याने पाळीसंबंधित समस्याही दूर होतात.

६)  शिंगाड्याच्या सेवनाने रक्तसंबंधित समस्या दूर होतात. जुलाब झाल्यास शिंगाड्याच्या सेवनाने फायदा होतो.

७) शिंगाडा खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. यामुळे उपवासात शिंगाड, शिंगाड्याचे पीठ खाल्ले जाते.......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा