काव काव

 काव काव काव
!!!!!!!!!!!!!!!!!!!!

रात्रीचे साडेनऊ वाजले होते. रात्रीचे जेवण आटोपून झोपण्यासाठी मी बेड आवरला. स्वयंपाक खोलीत सौ. ची आवराआवर सुरू होती. चिरंजीवही आपल्या बालक्रिडेत व्यस्त होते. कदाचीत माझ्यासोबत चिरंजीवांनाही झोपेची चाहुल लागली असावी. त्यामुळे तेही काहीसे आवराआवर करताना मला दिसले. झोपी जाण्यापूर्वी थोडं वाचलं तर झोप कधी येते हे कळतही नाही. काॅलेजला असताना रात्री जेवून वाचायला बसलंकी डुलकीवर डुलकी यायची. त्याचीच पुनरावृत्ती करायचे मी ठरवले होते.

पुस्तकांच्या गठ्ठ्यातून एक पुस्तक काढुन मी वाचायला लागलो. चिरंजीवही कसल्याशा कामात व्यस्त होते. मला वाचताना बघुन म्हणाले , 
" पप्पा , कोणतं पुस्तक वाचताय ? "
" सम्राट अशोक " मी वाचतच म्हणालो.
" पप्पा , तुमचं पुस्तक ठेवा. माझं पुस्तक वाचुन दाखवा. " 
माझ्या हातात त्यांचं एक पुस्तक देत चिरंजीवांनी फर्मान सोडलं. चिरंजीवांचं फर्मान म्हटल्यावर मी माझं पुस्तक बाजुला ठेवून त्यांनी दिलेलं गोष्टिचं पुस्तक वाचायला लागलो. तर चिरंजीव परत फर्मान सोडल्याच्या तोर्‍यात म्हणाले , 
" पप्पा , मला पुस्तकातली गोष्ट सांगा."
त्यामुळे मी पुस्तकातली कुठली गोष्ट सांगायचे हे शोधु लागलो.

मी पुस्तकाची पाने पलटत असताना चिरंजीवांची नजर एका गाणार्‍या कावळ्याच्या चित्रावर गेली. मग चिरंजीवांनी नविन फर्मान सोडलं , 
" पप्पा , मला कावळ्याचं गाणं सांगा."
आता माझी पंचाईत झाली. मी पुस्तकातील गोष्ट वाचून सांगावी या इराद्याने पुस्तक हातात घेतलं होतं. पण फर्माइसमध्ये ऐनवेळी बदल मला अपेक्षित नव्हतं. पण दुसरा पर्याय नव्हता. शेवटि नाईलाजाने मी कावळ्याचं गाण सुरू केलं.

काव काव काव
काव काव काव
काव काव काव

काव काव काव
काव काव काव
काव काव काव

माझं हे कावळ्याचं गाणं ऐकुण चिरंजीव पोटधरून हसु लागले. बेडरूममधिल हास्यकल्लोळ ऐकुन सौ. नी बेडरूममध्ये डोकावून बघितलं. दोघेही क्षणभर गप्प. सौ. परत फिरताच पुन्हा काव काव काव. पुन्हा एकदा आम्हा बापलेकांचा हास्यकल्लोळ. शेवटि चिरंजीवाने माझ्या तोंडावर दोन्ही हात ठेवून गाणार्‍या कावळ्याची कावकाव बंद केली आणि झोपी गेले................गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा