खाऊचा डबा
खाऊचा डबा - एक आरोग्यदायी उपक्रम
आधुनिक युगात जाहिरातींच्या भडीमाराने खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रसार माध्यमांतील जाहिरातीतून पाश्चात्यांचे होणारे अंधानुकरण यामुळे मुलांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. फास्ट फूड , जंक फूड तसेच चकचकित पॅकिंग करून विकले जाणारे अनारोग्यदायी पदार्थ मुलांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम करत आहेत. पूर्वी शहरात दिसणारे पदार्थ आता खेडोपाडी पोहचले आहेत. वाडी वस्त्यांवरही असे अनारोग्यदायी पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अशा पदार्थांची सहज होणारी उपलब्धता , आकर्षक वेष्टन आणि आधुनिक जिवनशैलीचे आकर्षण यामुळे शहरापासून खेड्यापर्यंतच्या मुलांमध्ये वेपर्स , चाॅकलेट , कुकिज , कुरकुरे , खारी , बिस्किटे , फुकण्या खाण्याचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे.
अशा अनारोग्यदायी पदार्थांच्या नियमित सेवणाने मुलांच्या पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोबतच दात किडणे , रक्ताची कमतरता , हाडे ठिसूळ होणे , लठ्ठपणा , डोळ्यांचे आरोग्य बिघडणे , सारखे पित्त वाढणे यांसारख्या अनेक आरोग्याच्या समस्यांना मुलांना तोंड द्यावे लागत आहे. या दुष्टचक्रातून मुलांची सूटका होवून त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी "खाऊचा डबा" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रमाची कार्यवाही -
विद्यार्थ्यांना अनारोग्यदायी पदार्थ खाण्यापासून परावृत्त करून आरोग्यदायी पदार्थांचे सेवन त्यांनी करावे , यासाठी विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यात आले. फास्ट फूड , पॅकिंगच्या , बेकरीच्या पदार्थांचे शरीरावर होणार्या दुष्परीणामांची जाणिव करून देण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व आरोग्याला घातक अशा पदार्थांची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना घरात सहजासहजी उपलब्ध होवू शकणार्या तसेच दुकानात उपलब्ध होणार्या पौष्टिक पदार्थांची यादी तयार केली.
या यादिमध्ये घरच्या घरी तयार होणार्या पदार्थांचा समावेश करण्यात आला. उदा. चिरमुर्याचे लाडु , शेंगदाणा चिक्की , रव्याचे लाडु , भाजलेले शेंगदाणे , आप्पे इत्यादी.
खाऊच्या डब्यातील पौष्टिक पदार्थांची छापिल यादी घराघरात वितरीत करण्यात आली. हि यादी घरी दर्शनी भागात लावल्याने पालकांनाही मुलांना आरोग्यदायी पदार्थ खाऊ घालणे सोईचे झाले.
यादीची एक प्रत शाळेत दर्शनी भागात लावण्यात आली. त्यामुळे मुले शाळेतही यादीचे अवलोकण करू लागले.
खाऊची यादी -
१) शेंगदाणा चिक्की २) भाजलेले शेंगदाणे ३) चिरमुरे ४) भडंग ५) चिरमुरे लाडु ६) डिंकाचे लाडु
७) भाजलेले हरभरे ८) गुळ शेंगदाणे ९) खजूर
१०) रव्याचे लाडु ११) राजगिर्याचे लाडु १२) मक्याच्या लाह्या १३) बेसनाचे लाडी १४) भाताच्या लाह्या
१५) चणे फुटाणे १६) उपीट १७) विविध फळे
१८) गाजर १९) काकडी २०) गाजराचा हलवा
२१) बेदाणे २२) बीट २३) उकडलेले अंडे
२४) अाॅमलेट २५) भाजलेले सोयाबिन २६) अंड्याचा गब्रा
२७) मोड आलेले कडधान्य २८) कडधान्यांची उसळ
२९) कोशिंबीर ३०) खोबर्याची वडी
३१) सुका मेवा ३२) अप्पे
उपक्रमाचे फायदे -
१) मुलांना पौष्टिक आरोग्यदायी खाऊ मिळाल्याने मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली.
२) घरच्या घरी पौष्टिक पदार्थ तयार केले जावू शकतात. याची जाणिव विद्यार्थी व पालकांना झाली.
३) आरोग्यदायी पदार्थ व आरोग्याला घातक पदार्थांची ओळख विद्यार्थ्यांना झाली.
४) दुकानातील खाऊ खायचे प्रमाण कमी झाल्याने खाऊच्या पैशांची बचत झाली.
५) खाऊचे पैसे विद्यार्थ्यांनी शाळेतील बचत बॅकेत साठवले.
६) दुकानातील खाऊपेक्षा घरातील खाऊ आरोग्यासाठी उत्तम असतो. याची जाणिव मुलांना झाली.
७) मुले पालकांकडे आरोग्यदायी पौष्टिक खाऊची मागणी करू लागले.
८) कमी श्रमात व कमी खर्चात घरीच पौष्टिक खाऊ बनवण्याची पालकांची मानसिकता तयार झाली.
९) मुले आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक झालीत.
१०) मुलांना पौष्टिक खाऊचे महत्व पटले.
---- श्री. गुलाब रमेश बिसेन , अध्यापक , जि. प. विद्यामंदिर उंड्री , पो. घोटवडे , ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ४१६२३०
मो. नं. ९४०४२३५१९१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा