पुस्तक परीचय - नागझिरा

 पुस्तक परीचय - नागझिरा


व्यंकटेश माडगूळकरांचं "नागझिरा" हे पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण केलं. तसं हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचलं. काही पुस्तकं एकदा वाचून मन नाही भरत. ते पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं. त्यातलंच हे एक.

व्यंकटेश माडगूळकर हे मराठीतील प्रसिद्ध लेखक. त्यांना जंगलातील प्राणी जीवनाची प्रचंड ओढ होती. त्याचाच परीपाक म्हणून ते १९७९ साली मे महिन्यात एक महिन्यासाठी नागझिरा येथे वास्तव्यास आले. नागझिरा हे भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील(झाडीपट्टी) दोन जिल्ह्यांत पसरलेले जंगल. या विस्तीर्ण जंगलात वाघ, हरीण, अस्वल, रानहल्ले (गवे), निलगाय, कांचनमृग, सांबर, डुक्कर,रानकुत्रे, माकड, भेकर,बिबट असे प्राणी मोर, सातभाई,मैना, गिधाड, दयाळ अशा नानाविध पक्षी आणि वनस्पतींनी नटलेला हा नागझिरा. जंगलाच्या मध्यभागी पाच एकरांचा असलेला भला मोठा तलाव जणू जंगलाचा डोळाच आहे.

अशा या नागझिर्‍यावर मला अधिक प्रेम असण्याचं कारण म्हणजे माझं गाव (सितेपार, ता. तिरोडा) या नागझिर्‍याच्या सानिध्यात जणू कुशीत वसल्यासारखाच आहे. आता हे जंगल व्याघ्र प्रकल्प म्हणून राज्याच्या वैभवात भर घालत आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी या जंगलात २५ दिवस थांबून येथील प्राणी, पक्षी आणि वनस्पतींचा धुंडाळा केला. या त्यांच्या मुक्कामात त्यांनी नागझिर्‍यातील प्राण्यांचे स्वभावगून बघितले. त्यांचा दैनंदिन व्यवहार जवळून अनुभवला. त्यांनी मचानावर बसून तलावावर पाणी प्यायला येणार्‍या प्राण्यांचे निरीक्षण नोंदवले. अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे सुरू असणारे संशोधन जवळून बघितले.

नागझिर्‍यातील तिरोड्याला जाणारा रस्ता माडगूळकरांना अधिक आकर्षित करायचा. कारण तलावावर पाणी प्यायला जाणार्‍या जनावरांना हा धुळीचा रस्ता ओलांडून यावे लागायचे. त्यामुळे रात्रभर प्राण्यांच्या चाललेल्या हालचाली त्यांना इथेच कळत. या रस्त्यावर प्राण्यांची सारखी वरदळ असायची. लेखक या रस्त्यावर रोज फेरफटका मारायचे. या रस्त्यावर कुठलाच प्राणी दिसला नाही असा एकही दिवस गेला नाही. तिरोडा रस्त्यावर आजवर कधीही न पाहिलेले प्राणी पाहिले असे लेखक म्हणतात.

लेखक जंगलातून कधी तान्सू मेश्राम या रानकाढ्या सोबत तर कधी एकटेच फिरायचे. फिरताना बघितलेल्या सर्व नोंदी त्यांच्या डायरीत करत. बारा रान कुत्र्यांची टोळी, प्रचंड शक्तीशाली गवे, कांचनमृगाचा कळप, उधयीचे वारूळ उकरणारा अस्वल असे अनेक प्राणी आणि त्यांच्या हालचाली लेखक बघायचे.

पुस्तकात एके ठिकाणी माडगूळकर लिहितात, "रस्ते हे वाहनांसाठी असतात आणि पायांसाठी पायवाटा असतात, हे जनावरांइतके कुणाला कळले नसावे. रस्त्यांचा उपयोग फक्त ओलांडण्यासाठी त्यांनी केलेला मी पाहिला." या जंगलातील असंख्य पायवाटा ह्या प्राण्यांच्या पाहूल खुणांनी भरलेल्या असायच्या.

अशा या रानवेड्या लेखकासोबत नागझिर्‍याचा फेरफटका नक्की मारून या.

<<<<<----- गुलाब बिसेन (०५/०६/२०२१ - जागतिक पर्यावरण दिन)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा