गावची दंडार , गावची शान

##  " गावची दंडार , गावची शान "  ##
०००००००००००००००००००००००००

 गोंदिया जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर वसलेला सितेपार गाव म्हणजे जिल्ह्याचा पश्चिम प्रवेशद्वार. निसर्ग सौंदर्याने नटलेला आमचा गाव. गावापासून हाकेच्या अंतरावर असलेला नागझिरा अभयारण्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टिने समृद्ध आहे . गावाला लोककलेचा समद्ध वारसा लाभला आहे. गावात नौटंकि ड्रामा , संगीत नाटक , तमाशा , भजन , किर्तन तसेच दंडार या लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. गावातील  " होली " समाज डफरी वादन कलेला जगवत स्वत:ही जगत आहे. गावाची ओळख या लोककलांपेक्षा वीट भट्टि ठेकेदारीसाठी अधिक असली तरी अलिकडे गावातील कलाकार कलाक्षेत्रात गावाची ख्याती वाढवत आहेत. लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या झाडीपट्टितील सितेपार गावात लोककलावंत घराघरात आहेत. ढोलक , तबला , सुरपेटि या वाद्यांपासून ते भजन , दंडार , नाटक या लोककलांचे कलाकार आजही पदरमोड करून कलेची जोपासना करत आहेत.

नांगोजी रहांगडाले (नांगो महाजन) यांनी त्यांच्या काळात सितेपारच्या दंडारीची बांधनी करून पंचक्रोशीत वेगळी ओळख निर्माण करून दिली. प्रसंगी पदरमोड करून नांगो महाजन आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी दंडार हि लोककला पुढच्या पिढिपर्यंत नेण्यात यश मिळवलं. परंतु त्यांच्या गेल्यानंतर या सितेपारच्या दंडारीला उतरती कळा लागली. त्यामुळे मधल्या काही काळात अनेक वर्षे दंडार प्रेमींनी बाहेर गावावरून मानधन देवून दंडार बोलवून मंडयीची शोभा वाढवली. दंडार नसण्यापेक्षा कुठली का असेना मंडयीला दंडार असलेली बरी. या हेतुने काही वर्षे बाहेरील दंडारीवर मंडयी साजरी झाली. परंतु गावातल्या दंडारीची सर त्याला कधीच आली नाही.

शेवटि शाहिर मधुजी उके यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या तसेच दंडार प्रेमींच्या साथीने दंडारीला पुनरूज्जीवित करण्याचा चंग बांधला. आणि मागील चार पाच वर्षांपासून गावच्या मंडयीची शोभा वाढवत आहेत. याचा सार्थ अभिमान गावकरी या नात्याने आम्हाला सदैव राहिल. शाहिर मधुजी उके यांच्या नेतृत्वात सितेपारची दंडार आता मुलुख मैदान गाजवत असुन बाहेर गावच्या मंडयींची सुपारी घेत गावाची किर्ती वाढवत आहे. बाहेर गावच्या मंडयीची शान वाढवणार्‍या आमच्या सितेपारच्या दंडारीतील सर्व बालकलाकार , गायक , वादक , सोंगाडे तसेच त्यांना सहकार्य करणारे मदतनीस या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी झाडीपट्टिची लोककला गावात नुसती जिवंत न राहता दिवसेंदिवस बहरत चालली आहे. हा लोककलेचा समृद्ध वारसा असाच चालत राहो यासाठी दंडार मंडळाची सर्व मंडळी रात्रंदिवस झटत आहे. त्या या कार्याला मानाचा मुजरा ।......... गुलाब बिसेन ( सितेपार , झाडीपट्टी )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा