माणसांपेक्षा मांजरं बरी

माणसांपेक्षा मांजरं बरी


 शुभकार्य करत असताना मुहुर्त बघनं हे आपल्या समाजात सर्वमान्य आहे. मुहुर्तावर केलेले काम निर्विघ्न पार पडुन ते तडिस जाते असा जनमानसात समज आहे. यासाठी जानकारांची मदत घेवून शुभकार्याची वेळ बघितली जाते. त्याचसोबत येणारी प्रत्येक वेळ शुभ मानुन कार्य करणारी मंडळीही आपल्या समाजात आहेत. ते मुहुर्त बघण्याच्या नादाला लागत नाहीत. परंतु एकंदरीत प्रमाण बघितल्यास मुहुर्त बघण्याकडे समाजाचा कल अधिक आहे. काहीवेळा याचा अतिरेक होतानाही आपल्याला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे कुठलेही काम करताना ( उदा. लग्न , बारसं , मुंज , वास्तुशांती , गृहप्रवेश , वाहनखरेदि  इ. ) मुहुर्त बघितल्याशिवाय न करनं.

बर्‍याचदा मुहुर्त बघुनही शुभकार्यात मांजर आडवी जाते. ( शुभकार्यात मांजर आडवी जाणं आपण अशुभ मानतो.) मांजर आडवी जाणं हे अशुभ असनं यात कितपत सत्यता आहे , हे संशोधकच जाणोत. कारण आपल्याकडे मांजर हा पाळिव प्राणी असुन तो घराघरात पाळला जातो. काही ठिकाणी न पाळताही त्याचा मुक्त वावर घरात असलेला दिसून येतो. त्यामुळे मांजर रस्त्यावरून येजा करणार हे नक्की. मग कुठे शुभकार्य सुरू आहे हे तिला कळेलच असे नाही. (शुभकार्य आणि अशुभ कार्य यातील भेद जानण्याइतपत मांजर हुशार असेल असं मला वाटत नाही.)

काही दिवसांपूर्वी एका ट्रकच्या पाठिमागे लिहिलेल्या ओळी माझ्या वाचनात आल्या. त्या अशा होत्या ,

" जिवनाच्या वाटेवर मांजरापेक्षा
माणसेच अधिक आडवे येतात."

वरील ओळी वाचत असताना मला शाळेत असताना गुरूजींनी सांगितलेली एक गोष्ट आठवली.

एकदा एका देशात खेकड्यांचे आंतरराष्ट्रिय प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनामध्ये जगभरातील अनेक देशाच्या प्रतिनिधिंनी भाग घेतला होता. प्रत्येक देशाच्या प्रतिनिधीने खेकडे काचेच्या भांड्यात ठेवले होते. प्रदर्शन सुरू झाले. प्रदर्शन बघायला आलेले मान्यवर पाहुणे प्रदर्शन बघत बघत भारताच्या खेकड्यांजवळ आले. भारताच्या खेकड्यांना बघत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली कि , भारत सोडुन इतर देशांच्या खेकड्यांच्या पेट्यांना झाकण लावलेले आहेत. भारतीय पेटिला मात्र झाकण लावलेले नाही. त्यामुळे प्रदर्शन बघणार्‍या पाहुण्यांच्या मनात कुतुहल निर्माण झाले. त्यांनी याबद्दल भारतीय प्रतिनिधींकडे विचारणा केली. तेव्हा भारतीय प्रतिनिधीने सांगितले कि , " भारतीय खेकडे हे एखादा वर चढताना दिसला कि त्याचा पाय ओढुन घेतात. त्यामुळे आपसुकच कुणालाही पेटिच्या बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आम्हाला पेटिला झाकण लावायची गरज पडत नाही. "

या गोष्टितील खेकड्यांची दुसर्‍याचे पाय ओढुन घेण्याची प्रवृत्ती कमी अधिक प्रमाणात माणसातही दिसून येते. दुसर्‍याची प्रगती माणसाला बघवत नाही. दुसरा आपल्या पुढे जातो हे सहन न होणारी मंडळी मग पुढे जाणार्‍याला नाना प्रकारे मागे खेचण्याचा प्रयत्न करत बसतात. एवढ्या प्रयत्नात ती व्यक्ती स्वत:च्या जीवावर पुढे जावू शकली असती. परंतु प्रवृत्तीतच दोष असल्याने स्वत:ची प्रगती करण्यापेक्षा दुसर्‍याचे पाय खेचण्यात उर्जा फुकट घालवण्यात धन्यता मानली जाते. मांजर हा निरूपद्रवी प्राणी असल्याने तो जरी माणसाच्या आडवा गेला तरी माणसाच्या कामात अडथळा निर्माण करण्याची कुवत त्यात नाही. खरेतर माणूसच माणसाच्या प्रगतीतील अडथळा बनत जातो. आणि आपण मात्र दोष बिचार्‍या गरीब मांजराला देवून बसतो.

लेखक -  श्री. गुलाब बिसेन
           मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया

मो. नं.  ९४०४२३५१९१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा