कंजुषी कराच

कंजुषी कराच



वाहनांची वाढती संख्या आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांच्या व्यस्त समिकरणामुळे सर्वसामान्य जनतेला इंधनदरवाढिला सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल , डिझेल , वीज पासून घरगुती वापराच्या गॅसपर्यंत सर्वत्र सारखी दरवाढ होत आहे. पेट्रोल , डिझेलचे दर गगनाला भिडले असून त्यात दररोज वृद्धिच होत चालली आहे. यात सर्वसामान्य जनता पुरती भरडली जात आहे. हे आज न उद्या घडणारच होते. नैसर्गिक साधन संपत्तीचे मर्यादित साठे कधिना कधी संपणारच. त्यामुळे अशा दरवाढिचा सामना कायमच करावा लागणार हे नक्की.

 नैसर्गिक इंधनाचा (उदा. पेट्रोल , डिझेल , एलपीजी गॅस) काळजीपूर्वक वापर करण्यासंदर्भात विविध कंपन्या ( उदा. हिंदुस्थान पेट्रोलियम , भारत पेट्रोलियम इ.) तसेच भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयामार्फत विविध प्रसारमाध्यमांतून (उदा. वर्तमानपत्र , टि.व्ही. , रेडिओ इ. ) जनजागृती केली जातेय.

अशाच जाहिराती टिव्हीवर कायम दिसत असतात. त्या म्हणजे वाहन पंचेचाळिसच्या वेग मर्यादेत चालवल्यास वीस टक्के इंधनाची बचत होवून परिणामी त्यावर होणारा इंधनखर्च वाचेल आणि तेवढि बचत होईल. याचसोबत सिग्नलवर उभे असताना गाडी बंद केल्यास इंधनाचीतर बचत होईलच शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास आपला हातभार लागेल. स्वयंपाक करताना कुकरचा वापर करा. अन्नपदार्थ शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा इत्यादि. यामागे जनतेत पारंपारिक इंधन वापरण्याच्या बाबतीत जनजागृती करून इंधनाची बचत व्हावी हा शासनाचा हेतू आहे.


एकदा सहकार्‍यांसोबत (दोघेही स्वतंत्र वाहनाने) घाटाच्या रस्त्याने जात असताना घाट उतरतेवेळी सुमारे तीन ते चार कि.मी. उतार होता. त्यामुळे उगाच पेट्रोल कशाला जाळायचा म्हणून मी गाडी बंद केली. आणि सहकार्‍यांनाही गाडी बंद करायला सांगितले तर त्यांनी गाडी बंद करण्यास नकार देत ,

" एवढि कंजुषी कशाला करताय ? "

म्हणत मला मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी प्रत्युतर न देता शांत राहिलो. जरा पुढे गेल्यावर मी त्यांना शांतपणे म्हणालो ,

" सर , गाडी सुरू न करता जात असेल तर उगाच पेट्रोल जाळण्यात काय अर्थ आहे. पेट्रोल जरी आपल्या पैशाचे असले तरी ते आपल्या शेतात पिकत नाही. ते विकत घेण्यात शासनाचा लाखो रूपयाचा चुराडा होतो."

यावर महाशय निरूत्तर झाले.

मला अजुन कळत नाही कि , इंधनाची बचत करणे हे कंजुषी कसे ठरते ? उगाच इंधन जाळणे यात कसली आली श्रीमंती ? वरील माझ्या मताच्या संदर्भात कदाचित व्यक्तिपरत्वे मतभिन्नता असू शकेल. असे असले तरी इंधनाची बचत करणे काळाची गरज आहे. यावर कुणाचे दुमत नसावे. मग इंधन बचत करणार्‍याला कुणी कंजुषाची उपमा दिली तरी चालेल.

मुळात नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित असल्याने तिचे डोळसपणे वापर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्यच आहे. इंधन बचत करणारी व्यक्ती कंजुष नसुन ती सुज्ञ असते. असे माझे वैयक्तिक मत आहे आणि या मतावर मी कायम ठाम आहे.

गरज नसताना वीज , गॅस , पेट्रोल , डिझेल इ. जाळणे हे भूक नसताना जेवण्यासारखेच आहे. भूक नसताना जेवले तर त्याचा विपरीत परीणाम आपल्या शरीरावर होवून शरीराचे नुकसान होते. तसेच इंधनाच्या बाबतीत घडते. गरज नसताना वीज , इंधन वापरणे हे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणारे ठरते.


आपल्याला भावी पिढिचे भविष्य अबाधित ठेवायचे असेल तर उपलब्ध इंधन , उर्जेचे डोळसपणे वापर करून अपारंपारीक उर्जा वापरावर भर द्यावा लागेल. यासाठी अनेक उपाय करण्यासारखे आहेत. घरात कमी उर्जेवर चालणारे एलईडी बल्ब वापरणे , गरज नसताना टिव्ही , पंखा बंद ठेवणे , सौरउर्जेचा वापर करणे , सौरचूल वापरणे , दिवसा लाईट ऐवजी सूर्यप्रकाशाचा वापर करणे इत्यादि उपाय आपण करू शकतो. प्रत्येकाने गरजेच्यावेळी इंधनाचा वापर करून शक्य तिथे इंधनाची आणि उर्जेची बचत करत राष्ट्राच्या विकासाला हातभार लावावा. इंधन - उर्जेची बचत करणे म्हणजे कंजुषी करणे नसून ते सुजान नागरीकाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाने उर्जा आणि इंधन वापराच्या बाबतीत कंजुषी कराच.

श्री. गुलाब रमेश बिसेन
मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया
मो. नं. ९४०४२३५१९१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा