भाषेची शेती करणारं गाव

भाषेची शेती करणारं गाव


माणवी उत्क्रांतीच्या काळात आपापसात संवाद साधण्यासाठी माणवाने भाषेची निर्मिती केली. पुढे भाषांचा विकास होवून यातून लोकांचा दैनंदिन व्यवहार चालु लागला. आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या असंख्य भाषांतून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बोलल्या जाणार्‍या भाषांवरून प्रांतरचना झाली. त्यातून आपला मराठी भाषिकांचा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आला. महाराष्ट्रात मुख्यत: मराठी हि मुख्य भाषा बोलली जात असली तरी चांदा ते बांदा पसरलेल्या महाराष्ट्रात मराठीचे रूप दर कोसावर बदलत जाते. त्यांनाच आपण बोली भाषा म्हणतो. याच बोलीला काही तथाकथीत सुशिक्षित मंडळी "गांवढळ / गावठी" असा शिक्का मारत ती बोलणार्‍या बहुसंख्य सर्वसामान्यांना हिनवण्यात धन्यता मानतात.

अशा ग्रामिण भाषेत संवाद साधणार्‍याला  "गावठी" संबोधले जाते. मात्र ग्रामिण बोली बोलणार्‍यांना गावंढळ किंवा गावठी संबोधने हे तथाकथित सुशिक्षितांचे केवळ आणि केवळ अज्ञान आहे. बर्‍याचदा सुशिक्षित मंडळी खोट्या प्रतिष्ठेपोटि बोली बोलायचे टाळतो. आपला देश हा खेड्यांचा देश आहे. शहरीकरणाच्या वादळात अनेक गावं ओस पडली. अनेक गाव निर्मनुष्य झाली असली तरी बहुसंख्य जनता अजुनही खेड्यात राहते आणि आपली बोली बोलते. गाव हे केवळ पिकांचीच शेती करत नाहीत तर ती भाषेचीही उत्तम शेती करतात. भाषेचे खरे पीक फुलते ते गावाच्या कुशीत. खोड्यातील माणसे आपल्या दैनंदिन व्यवहारांतून भाषेची मशागत करतात आणि तिला पुढच्या पिढीला हस्तांतरीत करतात. घरातील प्रमुख व्यक्ति घरचा कारभार मुलांच्या हातात सोपवतो. तशी भाषा ही एका पिढीकडुन दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत होत असते.

महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात बोलल्या जाणार्‍या विविध बोलींमध्ये विशिष्ट गोडवा आहे. झाडीपट्टित झाडीबोली बोलली जाते. झाडीपट्टितील गावांमध्ये फेरफटका मारून झाडीबोलीचा गोडवा सहज चाखता येईल. झाडीपट्टितील गावांमध्ये प्रवेश केलाकि प्रथम नजरेस पडतो तो  "आखर". गावातील प्रत्येक घरापुढे फावल्यावेळेत गप्पा मारायला बसण्यासाठी असते "धडी". जनावरांच्या गोठ्यांच्या विशिष्ट रचनेला इथे "डहेल" म्हणतात. शेतातील पीक काढणीला झाडीपट्टित म्हणतात "नवतरी". गायी चारणारा  "गायकी" तर दारू पिणारा होतो  "मड्डी". गावातील सर्वात सुपिक शेतीला इथे "गावखारी" म्हणतात. पावसाळा सुरू होताच शेतकरी शेत नांगरतो याला "चिराटा" म्हणतात. पिकांवरील पाखरं हुसकावून लावण्यासाठी शेतात तयार करतात तो "मार्‍या".

अशा एक ना अनेक शब्दमोत्यांनी नटलेली ग्रामिण बोली गावंढळ जरी असली तरी हिनवण्याएवढि शुद्र नक्कीच नाही. खरंतर तिच प्रमाणभाषेची जननी आहे. बोलीच प्रमाणभाषेला वाढवते आणि काळाच्या ओघात टिकवते. मुळात प्रमाणभाषा हि सुप्रतिष्ठित भाषा नसुन ती वाचन , लेखन , शिक्षण , राज्यकारभार , वृत्तपत्रे इत्यादि माध्यमांच्या सोयीसाठी माणलेली , मान्यता पावलेली अथवा मान्यता दिलेली भाषा आहे. इतर ग्रामिण बोलींप्रमाणेच हि बोली आहे. त्यामुळे कुठलीही ग्रामिण बोली हि इतर बोलींपेक्षा शुद्र नाही. मराठी भाषेला वाढवण्याचे आणि तिला टिकवून ठेवण्याचे काम बोलीच करत आहेत.

बोली ह्या खासकरून ग्रामिण भागात म्हणजेच गावांमध्ये बोलल्या जात असल्याने भाषेचं पीक घेण्याचं खरं काम गावं करत आहेत. हि गावं नुसतच भाषेचं पीक घेत नाहीत तर त्याचसोबत भाषेचं वाण टिकवून ते पुढच्या पिढित पेरण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे भाषा संवर्धनाचं खरं श्रेय या गावांना जातं. गावांना कुणी हे श्रेय देवो अथवा न देवो , जोपर्यंत गावं अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्यांचं भाषा संवर्धनाचं काम अविरत सुरूच राहिल.

- गुलाब बिसेन ,
मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया
मो. नं. ९४०४२३५१९१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा