तान्हापोळा

# झाडीपट्टिचा लोकोत्सव .... तान्हापोळा  #
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

पोळा कास्तकारांचा कष्टकरी मित्र बैलांच्या उपकारातुन उतराई होण्याचा सण. या सणाला बैलांना सजवून , नटवू थटवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. गावाबाहेर मोकळ्या मैदानात किंवा गावाच्या चौकात बेलांची विधिवत पूजा केली जाते. पारंपारीक झळत्या म्हणून पोळ्याची सांगता होते. घरी आलेल्या बैलांचे पूजन करून त्यांना पंचपक्वान्न खावू घातले जातात. हा बैल पोळ्याचा सण संपूर्ण राज्यात बळिराजा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पूर्व महाराष्ट्रात ( झाडीपट्टि ) बैल पोळा सणाला जोडुन  " तान्हापोळा "  साजरा केला जातो. पोळ्याचा दुसरा दिवस बच्चेकंपणीच्या आनंदाला उधाण आणणारा असतो. आठवडाभरापासून घराघरात तान्हापोळ्याची लगबग सुरू होते. बैलपोळ्याच्या दुसर्‍या दिवशी लहान मुले आपले लाकडी नंदि (बैल) सजवण्यात व्यस्त असतात. हे लाकडी नंदि घासून , पुसुन , धुवून स्वच्छ केले जातात. घरातील मोठी मंडळीही यात सक्रिय सहभागी असतात. लाकडी नंदिला रंगरंगोटि करून सजवले जाते.

लहान मूल असलेल्या घरात खात्याकडुन (सुतार) लाकडी नंदि बनवून घेतला जातो. या नंदि बैलांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना चाकं लावलेली असतात. त्याचसोबत हे नंदि अर्धा फुटापासून ते तीन , चार फुट उंचीचेही असतात. या नंदिला दोरी बांधुन अगदि लहान मुलेही सहज ओढुन नेतील अशी चाकांची रचना असते. दिवसेंदिवस नंदिची उंची आणि सजावटिमध्ये बदल होताना दिसत आहे. लहान मुले तसेच त्यांचे पालक कल्पकतेने सजावट करतात. यामध्ये घरच्यांचा सक्रिय सहभाग असतो.

घराघरांत बालगोपालांनी सजवलेले नंदि वाजत गाजत मिरवणुकिद्वारे गावाच्या चौकात आणले जातात. यावेळी बालगोपाल पारंपारीक वेश परिधान करून आपला नंदि घेवून पालकांसोबत येतात. चौकात आंब्याच्या पानांचे तोरण साधारण चार ते पाच फुट उंचिवर बांधले जाते. या तोरणाच्या खाली बालगोपाल आपले नंदि घेवून ओळिने उभे राहतात. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नंदिंचे विधिवत पुजन केले जाते. यावेळी सर्व मंडळी नंदि घेवून आलेल्या बालगोपालांना तांदळाचा टिका लावतात. त्यानंतर परिक्षकांच्या हस्ते सर्व नदिंचे परिक्षण केले जाते. त्यातील सुंदर सजावट केलेल्या नंदिंना अनुक्रमे नंबर काढुन बक्षिस वितरण केले जाते. खाऊ वाटप करून तोरण तोडुन तान्हा पोळ्याची सांगता केली जाते.

पोळ्यातून नंदि घेवून आलेल्या बालगोपालांचे घरी औक्षण करून स्वागत केले जाते. यावेळी घरची मंडळी बालगोपालांना बक्षिसही देतात. पैशांच्या स्वरूपात बक्षिस  " बोजारा "  म्हणून देण्याची पद्धत झाडीपट्टित आहे. घरचा मानपान झाल्यावर बच्चे कंपणी आपले नंदि घेवून शेजारी , गावातील पाहुण्यांच्या घरी आपले नंदि घेवून जातात. तिथेही त्यांचे शाही स्वागत केले जाते. बोजारा स्वरूपातील बक्षिस घेताना बालगोपालांचा तोरा बघण्यासारखाच असतो.

 तान्हा पोळ्याला दिवसेंदिवस बालगोपालांचा मिळणारा प्रतिसाद हा वर्षागणिक वाढतच आहे. ग्रामिण भागापासून अगदि शहरी भागापर्यंत हा तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला लोकाश्रय मिळाल्याने सामाजिक सलोखाही वाढत आहे. काही गावांतील प्रसिद्ध तान्हापोळा बघण्यासाठी पंचक्रोशीतिल मंडळी मोठ्या उस्तहाने मुलांना घेवून जातात. आमच्या भागात वडेगाव (ता. तिरोडा) आणि जांभोरा (ता. मोहाडी) येथिल तान्हापोळा बघण्यासाठी लोकांची झुंबड उडते.

तान्हा पोळा या अस्सल झाडीपट्टि उत्सवाला मिळालेला लोकाश्रय या उत्सवाला अमरत्व प्राप्त करून देयील यात शंका नाही........... जय झाडीपट्टि.......... गुलाब बिसेन ( मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया ) ( मो.९४०४२३५१९१ )

( सर्व फोटो - फेसबुक मित्रांच्या सौजन्याने )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा