गोपाल - एक आठवण

##   गोपाल.......एक आठवण   ##

आमच्या शालेय दिवसात कुठेही एखादा कार्यक्रम असला ( उदा. लग्न , तेरवी , सपटा इ. ) कि , तिथे एका व्यक्तिचे दर्शन हमखास व्हायचे. ती व्यक्ती म्हणजे " गोपाल ".  साडे चार पाच फुटाचा , सळपातळ बांध्याचा , डोक्यावर मळकट पांढरी टोपी आणि मळलेला शर्ट , पॅंट घातलेला , महिनोनमहिने आंघोळ न केलेला गोपाल गावात आलाकी , त्याच्याभोवती लहान मुलांचा गलका व्हायचा. " गोपाल आला , गोपाल आला " असे ओरडत मुले संपूर्ण गावाला गोपाल आल्याची वर्दि द्यायचे. मिळेल ते खायचे आणि मिळेल तेव्हा खायचे , गावातील मंदिरात रात्र काढत परत पुढचा प्रवास सुरू करायचा. हाच त्याचा दिनक्रम असायचा.

गावातील मुलांना बघायला मुलांची झुंबड उडायची. तो जिकडे जाईल तिकडे लहान मुलांची टोळकी जायची. मग कुणी त्याला डिवचण्याचा , त्याची टोपी काढुन घेण्याचा प्रयत्न करू लागला कि , गोपाल मग अस्सल पोवारीमध्ये शिव्या देत त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा. गोपाल गावात आला तर तो कुणाच्याही घरी जात नसे किंवा  पोटात भूक असली तरी तो कुणालाही खायला मागत नसे. त्यामुळे कित्येक दिवस त्याचा उपवास घडायचा. एखाद्याने त्याची दया येवून खायला दिलं तर मग तो दोन ते तीन माणसांचं जेवण एका दमात फस्त करायचा. तो रस्त्याने जायचा आणि गावातील चौकात   घुटमळायचा.

गावात एखादा उत्सव , लग्न समारंभ , तेरवी , घराचे विहिरीचे , सत्यनारायनाची पूजा , वास्तुक असले कि गोपाल तिथे जावून नुसता उभा राहायचा. मग माणसे गोपालला पोटभर जेवायला वाढायचे. जेवण झाले की , गोपाल तिथुन काढता पाय घ्यायचा. गोपाल एकावेळी दोन तीन माणसांचं जेवन सहज खायचा. एखाद्या पंगतीच्या शेवटच्या टोकावर गोपाल जेवायला बसलेला दिसला कि वाढप्यांनाही हुरूप यायचा. सगळ्यांच्या नजरा गोपाल किती जेवतोय हे बघण्यासाठी त्याच्यावर खिळलेल्या असायच्या.

गोपाल मूळचा आमच्या गावाशेजारील जांभोरा टोला येथील रहिवासी. तो कधिपासून पागल (खुळा) झाला किंवा तसा वागु लागला हे माहित नाही. पण मला समज आल्यापासून मी त्याला आमच्या गावात तसेच खेडेपार , किसनपूर , जांभोरा या गावांमध्ये एकटाच फिरताना बघायचो. उन्हाळा असो कि पावसाळा त्याची या चारपाच गावांत कायम भटकंती सुरूच असायची. तो आपल्या भावाच्या बायकोला कायम शिव्या देत राहायचा. तो आपल्या भावाच्या बायकोला शिव्या का देतो याचे मला कायमच कोडे पडायचे ? गोपालचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कधिही स्वत:हुन कुणाच्या वाट्याला जायचा नाही. पण कुणी त्याच्या वाट्याला गेला तर मात्र तो रस्त्यावर पडलेल्या दगडांनी अचुक नेम साधत मारा करायचा. बर्‍याचदा त्याला चिडवणारी मुले दुसरीकडे पळुन गेल्यामुळे तिसर्‍यालाच दगड लागायचे.

जांभोर्‍यात आमच्या मामांच्या घरी दरवर्षी गणपती विसर्जनादिवशी गोपाल हमखास जेवायला आलेला असायचा. त्याला एखाद्या गावात कार्यक्रम असल्याचे समजल्यावर तो त्या कार्यक्रमस्थळी घुटमळायचा. मग कार्यक्रमाला उपस्थितांपैकी कुणीतरी पंगत बसल्यावर किंवा पंगतीला उशिर असल्यास गोपालला जेवायला बोलवून त्याला जेवायला वाढायचे. गोपाल पोटभर जेवल्यावर सगळ्यांना समाधान वाटायचे. आता गोपालला देवाज्ञा होवून (अंदाजे ) सात आठ वर्षे झाले असतील. त्याच्या जाण्याने कुणाला काही फरकही पडले नाही. परंतु गोपालच्या जाण्याने कार्यक्रमांतल्या जेवणाच्या पंगती मात्र त्याच्याशिवाय सुन्या सुन्या वाटतात............. गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा