निरागस बालपणाचा सोबती - दोस्त ऋतू

निरागस बालपणाचा सोबती - दोस्त ऋतू


                कथा, कविता, समीक्षा इत्यादी माध्यमातून बालसाहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ बालसाहित्यिक विश्वास वसेकर यांचा बालमनाला भुरळ घालणारा "दोस्त ऋतू" हा बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. रंगीत चित्रे, आकर्षक मुखपृष्ठ आणि दर्जेदार कविता असलेला हा बालकवितासंग्रह बघताक्षणी कुणालाही भुरळ पडेल असाच आहे. या बालकवितासंग्रहाची शिर्षक कवितेने झालेली सुरुवात अत्यंत समर्पक असल्याचे कविता वाचल्यावर जाणवते. दोस्त ऋतू या कवितेत कवी आपल्या खास शैलीत ऋतुंचे वर्णन करताना लिहितात, 

थंडी असते चक्क गुलाबी 

हेमंताचा थाट रूबाबी 

पानगळीचा रंग बदामी 

ऋतूच्या अंतर्यामी

               कळी आणि फूल यांच्यातील नातं तर अगदी हळूवार अलगडत कवीने कळी आणि फूलाचे नाते अधिक परस्पर जिव्हाळ्याचे केले आहे. त्याचे वर्णन वाचताना वाचकाला फुलांच्या विश्वात गेल्याची अनुभूती येते. बाळ झोपी जातो तेव्हा तिथे कुणी धांगडधिंगा करायचे नाही. हे कविने "श्यू" या कवितेतून ढग, पोपट, दयाळ, विठू यांच्या प्रतिकांतून खूपच मजेशीर पद्‌धतीत सांगितले आहे. ते वाचताना लहानथोर सारेच बाळमय झाल्याशिवाय राहत नाही. एवढे ते लोभसवाणे आहे. कविंच्याच शब्दांत म्हणायचे झाले तर,

नका ढगांनो ओरडू 

नको आकाशात वीज 

सायलीची चंद्रफुले 

तशी हळूवार नीज 

आदळत आपटत 

काही करायचे नाही 

बाळ जेव्हा झोपलेला 

कोणी बोलायचे नाही.

               काळाच्या पडद्याआड झालेला डायनासोर आजही बालकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेला आहे. विविध चित्रपट, कार्टून शो यांच्या माध्यमातून मनामनात घर करून बसलेला डायनासोरचे वर्णन कविने आपल्या "पार्क म्हंजे बाग" या कवितेतून केले आहे. घरातील म्हातारी माणसं आजी, पणजी म्हणजे लहान बाळाचे लाडपुरवणारे सोबती. बाळाला गाणी गोष्टी सांगणारी, बाळाचे लाड पुरवणारी आजी, पणजी सर्वांनी बालपणी बघितली असेलच. अशी पणजी "पणजी" या कवितेतून वाचायला मिळते. लडीवाळ पणजीचे वर्णन करताना कवी लिहीतात,

 आधी कमरेला पट्टा बांधते 

मग तोंडाचा पट्टा सोडते 

वाकता नाही येत पण

झाडून काढते लख्ख अंगण 

पाळण्यात अस‌णाऱ्या बाळाची रोज नवी धडपड सुरू असते. कधी पायांची सायकल, तर कधी हातांनी बॉक्सिंग सुरू असते. कधी बोलण्यासाठी धडपड तर कधी पद्‌मासनात बसण्याची कसरत अशा बालकाच्या हालचाली कविने "पाळण्यातून" या कवितेत अत्यंत सहजपणे टिपलेल्या आहेत. "नाच" कवितेतून बाळाच्या विविध बाळलिला वाचताना वाचक अगदी तल्लीन होऊन आतो. कितवा नंबर, झाडे चालायला लागली, श्रावणीचा फोन, तारे जमीं पर या कविता कवितासंग्रहाला अधिक वाचकप्रिय बनवतात. 

             बाळाचं नाव ठेवताना घरातील माणसं, जवळचे नातलग यांच्यामध्ये वेगवेगळ्या नावांवरून होणाऱ्या चर्चा, त्यातून एका नावावर न होणारे एकमत अशा एक ना अनेक गोष्टी घडत असतात. कुणाला हे नको तर कुणाला ते नाव नको. अशावेळी अनेक गमतीजमतीही घडत असतात. घरातील अशा परिस्थितीवर कवीने "बारसं" या कवितेत बाळाचे नाव काय ठेवायचं याचं खुमासदार वर्णन केलेले आहे. ते लिहितात,

"नाव काय ठेवायच" 

"काय नाव ठेवायचं?" 

"असं नाव पाह्यजे गड्या" 

"तसं नाव नको ग बाई"

शेवटी नाव कसं असावं तेही कवी कवितेतून सुचवतात. ते म्हणतात, 

नाव असावं फुलाचं 

किंवा त्याच्या झाडाचं 

नावं असावं पक्ष्याचं 

किंवा त्याच्या आकाशाचं 

         कवी विश्वास वसेकर यांच्या बालकवितांमध्ये मोठ्यांना वाचनातून खिळवून ठेवण्याची जेवढी ताकद आहे, तेवढीच बाळाचे मनोरंजन करण्याची ताकद आहे. त्यांच्या कवीता बालकांना कोणताच उपदेशाचा डोज पाजत नाहीत. तर त्यांचे निखळ मनोरंजन करतात. याची प्रचिती ढेकर काढण्याचा मंत्र, बाऊ बरा करण्याचा मंत्र, मालनबाई, बोबडकांदा इ. कविता वाचताना वाचकाला येते. लदान मुलांना एखादी जखम झाली तर…..

कण्हायचं नाही, कुंथायचं नाही 

बाऊकडे लक्षच द्यायच नाही 

असे म्हणत कवी "बाऊ” या कवितेतून बालकाच्या जखमेवर अलगद फुंकर मारतात.

           कवी विश्वास वसेकर यांचा हा बालकविता संग्रह थोरा मोठ्यांसोबतच लहानग्यांना क्षणार्थात आपलंसं तर करतातच शिवाय बाळाचे बालपणही समृद्ध करतात. त्यामुळे हा कविता संग्रह बालसाहित्यामध्ये आपली वेगळी छाप उमटवेल हे नक्की. या कवितासंग्रहाची पाठराखण अ.भा. मराठी साहित्य संमेलन उद‌गीरचे संमेलनाध्यक्ष साहित्यिक भारत सासणे यांनी केली आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांच्या कुंचल्यातून साकारलेले मुखपृष्ठ आणि अंतर्गत चित्र अप्रतिम असेच आहेत. संस्कृती प्रकाशनाने निर्मिती केलेला हा कविता संग्रह अत्यंत आकर्षक झालेला आहे. मुलांशी सहज गट्टी जमवणारा हा कवितासंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास आहे.


पुस्तकाचे नाव - दोस्त ‌ऋतू

कवी - विश्वास वसेकर

प्रकाशक - संस्कृती प्रकाशन, पुणे

मूल्य - 120 रु.

पुस्तक परिचय - गुलाब बिसेन

मो.नं. 9404235191

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा