विद्यार्थ्यांच्या काव्यमय निर्मितीचा सुंदर अविष्कार - वायगावची बालकविता

विद्यार्थ्यांच्या काव्यमय निर्मितीचा सुंदर अविष्कार - वायगावची बालकविता 

      गोंदिया जिल्ह्यातील सितेपार या गावचे आदर्श शिक्षक गुलाब बिसेन हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव या शाळेत कार्यरत आहेत. त्यांची आजपर्यंत सात पुस्तके प्रकाशित आहेत. यात सृजनशाळा, खोपळीमाकी दिवारी, फिपोली, नवतरी, गावतर, बाबांची सायकल आणि वायगावची बालकविता या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्यांना आजपर्यंत अनेक नामवंत साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा नुकताच वायगावची बालकविता हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा संपादित केलेला बालकवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व सृजनशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांनी त्यांच्याकडून काव्य निर्मिती करून घेतली आहे. ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.

        गुलाब बिसेन हे एक संवेदनशील साहित्यिक आहेत. त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मित कवितांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयावर काव्य निर्मिती करून घेतली आहे. या बालकाव्यसंग्रहात एकूण 26 कवितांचा समावेश आहे. यात झाड, फुल, पुस्तक, शेत, आई, आणि शाळा अशा मुलांच्या भाविश्वाशी संबंधित सोप्या सोप्या विषयांचा समावेश आहे.

            मोठे झाड या पहिल्याच कवितेतून इयत्ता सातवीच्या दिव्या मेश्राम हिने आपली चुणूक दाखवली आहे. झाड आपल्याला काय काय देते याचे वर्णन करत तिने झाडाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर गुंजन श्रीरामे हिने फुलांविषयी कविता लिहीत फुलांचे आपल्याला काय उपयोग होतो ते तिने आपल्या कवितेतून मांडले आहे. वांग्याची सोनी कोकोडे या मुलीने पुस्तकाविषयी कविता लिहीत पुस्तकातून आम्हाला ज्ञान मिळते. पुस्तक हा आमचा मित्र असून पुस्तकात खूप सुंदर चित्र असतात. पुस्तकातील सुंदर सुंदर कविता माझी मैत्रीण वाचते. असे पुस्तक आमचा साथी आहे अशी ती सांगते.

        प्राची मानगुळदे ही बालकवयित्री आपल्या शेत या कवितेत म्हणते,

माझे हिरवेगार शेत आहे. त्या शेतात आम्ही खत टाकतो. शेतकरी शेतात काम करून घाम गाळतो. शेतकरी शेतात खूप राबतो आणि धन आल्यावर खुश होतो अशी शेतकरी जीवनावर तिने लिहिलेली शेती कविता वाचकांना मंत्रमुग्ध करते. 

           इयत्ता सहावीचा आर्यन लोणबले आपल्या आई या कवितेत सतत ओरडणाऱ्या आईच्या सूचनांविषयी तो लिहितो. तर आठवीतील कुमारी श्रावणी बुलबुले अंकगणित या कवितेत अंकांच्या ठिक्यात यमक जुळवत सुंदर कविता तयार केली आहे. ती आपल्या कवितेत म्हणते, 

एक दोन तीन चार 

पाऊस आला फार फार 

पाच सहा सात आठ 

पाऊस नाही सोडणार पाठ 

नऊ दहा अकरा बारा 

बैल खातात हिरवा चारा

    अशा सुंदर कवितेचा शेवट करताना ती म्हणते 

झाडावर बसले पांढरे बगळे 

अंक म्हणा मजेत सगळे 

      अशाप्रकारे छोट्या बालचमूंना अंकांचे ज्ञान देत तिने सुंदर कवितेची निर्मिती केली आहे. ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.

    इयत्ता पाचवीची प्राजक्ता गणवीर आपल्या प्राजु या कवितेत म्हणते,

एक आहे आमची प्राजु 

 तिच्या भावाच नाव राजू 

ती आहे खूप हुशार 

अभ्यास करते फार फार 

राजूला आवडतात छोटी फुल

कानात घालती बनवून डूल 

        अशाप्रकारे विशिष्ट चालित, लईत आणि ठेक्यात या कविता बालवाचकांच्या मनात घर करतात. मुलांनी मुलांसाठी लिहिलेले हे बालसाहित्य असल्याने ते त्यांना विशेष भावते. या कवितेतून प्रेरणा घेऊन इतर मुलीही त्यातून शिकतील आणि अशाच प्रकारच्या सुंदर रचना करतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो.

        पूजा रामटेके आपल्या कावळ्या कवितेत म्हणते,

कावळ्याला तहान लागल्यावर तो मडक्याकडे आला व त्यात खडे टाकून पाणी वर आणले ते पिऊन तो भुरकन उडून गेला. मृणालिनी गणवीर आपल्या रंगाचे गाणे या कवितेत म्हणते, 

पांढरा कापूस काळा कावळा 

आईने आणला आंबट आवळा 

पांढरी गाई तांबूस शेळी 

 माकड खात होता केळी

      अशा लय मध्ये रसलेले या कवितेच्या शेवटी ती म्हणते,

 लाल डाळिंब हिरवी मिरची 

ताईने केली बेरीज संख्यांची 

      अशाप्रकारे साध्या साध्या छोट्या रचनेतून बालकवींनी वाचकांची मने जिंकली आहेत.

     संबोधी रामटेके आपल्या परी या कवितेत म्हणते, 

एक होती परी तिचे नाव राणी परी 

परी परी दिसते गोड ती खाते आंब्याची फोड 

    परी विषयी सुंदर रचना करताना शेवटी ती म्हणते, 

परी गेली गावाला तिला न्यायला बाबा आले. 

     तर रिया सावसाकडे आपल्या पावसाळ्या या कवितेत म्हणते, 

आला आला पाऊस आला 

गार वारा सोबत आला 

आला आला पाऊस आला 

सगळीकडे पूर आला 

   या पावसाळ्याचे वर्णन करताना शेवटी ती म्हणते, 

आला आला पावसाळा 

सगळीकडे पाऊस धारा 

       लहान मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे त्यांनी दिलेले हे कवितांचे पोषक खाद्य अफलातून आहे. बिसेन यांनी केलेला हा प्रयोग भलताच यशस्वी झाला आहे. अशा प्रकारचे प्रयोग शाळा शाळांमध्ये झाली तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यांच्या सृजनशीलतेचा विकास होईल.

              गोंदिया येथील सर्व गोकुल प्रकाशन यांच्या नावाजलेल्या प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. शुभांगी भगत यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ,कवी, लेखक, प्राध्यापक, डॉ. धनराज खानोरकर यांनी या पुस्तकाला शुभेच्छा संदेश दिला आहे. नांदेड येथील साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त कवी डॉ. सुरेश सावंत यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. संपादक गुलाब बिसेन यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!

पुस्तकाचे नाव - वायगावची बालकविता

संपादक - गुलाब बिसेन

प्रकाशक - गोवर्धन बिसेन बुक पब्लिशर

प्रकाशन वर्ष - 4 डिसेंबर 2025 

पृष्ठे       - 36

मूल्य      - 50 रु.

समीक्षक - सचिन बेंडभर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा