अवकाशातील अद्भुत दुनियेची सफर घवणारा बालकवितासंग्रह - आकाश कोडी

अवकाशातील अद्भुत दुनियेची सफर घवणारा बालकवितासंग्रह - आकाश कोडी

बालसाहित्यिक प्रा. देवबा पाटील यांनी त्यांच्या लेखनातून मनोरंजनासोबत वाचकांना विज्ञानाची गोडी लावण्याचा सतत प्रयत्न केला आहे. कथा, कविता, कोडी इत्यादी लेखन प्रकारातून आजवर बालवाचकांसाठी बालसाहित्याची सुबक अशी मांडणी त्यांनी केली आहे. बालसाहित्यातून त्यांनी निखळ मनोरंजनासोबतच वैज्ञानानिक दृष्टीकोन ‌निर्माण व्हावा, यासाठी अवतीभवती घडणार्‍या घटनांतील विज्ञान त्यांनी सोप्या पद्धतीने बालवाचकांपर्यंत पोहचवले आहे.

'आकाश कोडी' हा प्रा. देवबा पाटील यांचा बालकविता संग्रह नावाप्रमाणेच अनंत आकाश पोकळीत सामावलेल्या अद्भुत जगाची सफर घडवणारा आहे. कोड्यांच्या माध्यमातून आकाशातील अद्भुत जगाची उकल या कवितासंग्रहातून कवीने सुंदर शब्दांत केली आहे. या कवितासंग्रहामध्ये एकुण तेवीस कवितांचा समावेश आहे. प्रत्येक कवितेच्या शिर्षकात ओळखा या शब्दाची गुंफण केली आहे. यातून वाचकाची उत्कंठा आपसुकच वाढते. या कविता वाचताना सहज पद्धतीने अवकाशातील सुंदर जगाची ओळख होते. कवीने या कवितासंग्रहाची सुरुवात करताना,
आपणास जरी दिसते निळे 
ते विशाल पोकळी काळे 
असंख्य त्यात आकाशगंगा 
अगणित तयात तार्‍यांच्या रांगा
अशा शब्दांत आकाशाच्या दृष्य रंगाची मांडणी कवीने केली आहे.

आकाश आणि त्यातील ग्रहतारे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. चांदोबातर लहान मुलांचा सवंगडीच बनून जातो. आकाशगंगा, ग्रह, तारे, सूर्यमाला, सूर्य, उपग्रह, पृथ्वी, बुध, मंगळ गुरु, शनि, सूर्यप्रकाश, उल्का, धूमकेतू, कृष्णविवर, तेजोमेघ, ध्रुवतारा आदी अवकाशातील गोष्टींची ओळख कवितांच्या माध्यमातून कोडी घालत कवीने करून दिली आहे. या कविता कोड्यांची उत्तरे पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहेत. त्यामुळे बालवाचकांना कविता वाचून आपले पूर्वज्ञान तपासून बघता येते. सोबतच नविन ज्ञानही ग्रहण करता येते.

सूर्यमाला आणि त्यामध्ये विशिष्ट दिशा, वेग आणि अंतराने फिरणारे ग्रह यांचे आकर्षण बालमनाला नेहमीच असते. यातील सूर्यमालेची निर्मिती कशी झाली याचे वर्णन करताना कवी लिहितो,
सूर्यस्फोटातून झाली निर्माण 
त्याने गुंफली माळा छान
एक बहीण आठ भाऊ 
माझी मुलं आहेत नऊ

सजिव सृष्टीला अत्यावश्यक असलेला सूर्यप्रकाश वनस्पती शोषण घेवून अन्न बनवतात. या सूर्यप्रकाशाचे वर्णन कवी कोड्यातून असे करतो,
 तो नसता तर दिस‌ले नसते काही
कठीण झाले असते जीवन जगणेही 
सकाळी पडता भूवर 
आनंद होतो सार्‍यांस 
तुमच्यापैकी कुणीतरी ओळखा ना तयास 
हा कविता संग्रह वाचताना पानोपानी कवीच्या काव्य शैलीची भुरळ मनाला पडत जाते. अवतीभवतीचे विज्ञान सोप्या पद्‌धतीने सांगण्यात कवीची हातोटी आहे. कवी प्रा. देवबा पाटील हे बालमन जाणणारे कवी आहेत. बालमनात विविध वस्तूंविषयी, घडणाच्या घटनांविषयी उत्सुकता असते, ही गोष्ट जाणून कवीने कवितातून बालमनाची उत्सुकता शमविण्याचा यशस्वी प्रयत्न खेल्याचे जानवते. आपण राहतो ती पृथ्वी कशी निर्माण झाली? ती कशी आहे? सूर्यमालतील तिचे स्थान कोणते? इत्यादी प्रश्नांची उत्तरे 'मला ओळखा' ही कविता वाचल्यावर वाचकाला मिळते. या कवितेत कोड्याच्या स्वरूपात पृथ्वीचे वर्णन करताना कवी लिहीतात,
नाही सरळ मी गोलाकार 
सूर्याभोवती फिरते वारंवार 
अशी आहे मी तुमची माता 
कोण कोण मला ओळखता?
'आकाश कोडी' हा बालकवितासंग्रह वाचताना अवकाशातील ग्रह, तारे, सूर्यमाला यांच्या विस्मयकारी दुनियेची जाणीव होते. डोळ्यांनी दिसणारे हे अवकाशीय जग किती वैविध्यपूर्ण आहे, हे या संग्रहामध्ये पानोपानी वाचायला मिळते. या कविता संग्रहातील 'ओळख ती कोण?' या कवितेत 'उल्का' चे वर्णन करताना कवी लिहीतात, 
आम्ही आहोत तुकडे गोळे 
खडक धुलीचे कडक सगळे
सूर्यस्फोटांतून आम्ही उपजलो 
सूर्याभोवती फिरू लागलो 
असे यथार्थ वर्णन या कवितेतून कवीने केले आहे.

कवी प्रा. देवबा पाटील यांनी या कवितासंग्रहातून बालवाचकांच्या मनातील कुतुहल सोप्या सर्व शब्दांमध्ये शमवत बालमनात विज्ञानवाद पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संग्रहातील सर्वच कविता ज्ञानाचा स्त्रोत आहेत. या कवितासंग्रहाला विष्णू शिंदे यांनी सविस्तर प्रस्तावना दिली असून डाॅ. मनोहर जाधव यांनी या संग्रहाची पाठराखण केली आहे. पुस्तकाची सुंदर माडणी तसेच चित्रांची सुबक रचना या कविता संग्रहाला अधिकच सुंदर आणि आकर्षक बनवण्याचे काम करतात. हा बालकविता संग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल हा विश्वास आहे. कवी प्रा. देवबा पाटील यांच्या लेखनकार्यास खूप शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव - आकाश कोडी
कवी - प्रा. देवबा पाटील
प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे
किंमत - १३०/- रु
समीक्षक - गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर
Mob - 9404235191

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा