कथा - बाबांची सायकल
कथा - बाबांची सायकल
टेंभर्यांची सुषमा अभ्यासात खुप हुशार होती. शाळेत परीपाठापासून बालसभेपर्यंतची धुरा तीच सांभाळायची. शाळेत सामान्यज्ञानाची परीक्षा असो कि भाषणांची स्पर्धा , तिने पहिला नंबर कधिच सोडला नाही. अभ्यास असो वा खेळ तिचा पहिला नंबर ठरलेला ! त्यामुळे साहजिकच ती शाळेतील सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थीनी होती. यावर्षीच्या शाळेचा आदर्श विद्यार्थ्याच्या बक्षिसासाठीही तिचंच नाव शिक्षकांनी निश्चित केलं होतं.
सुषमाचा अभ्यास आणि इतर सर्व घडामोडींवर तिचे वर्ग शिक्षक बोपचे सरांचे बारीक लक्ष असायचे. बोपचे सरांना तिच्या हुशारीचा खूप हेवा वाटायचा. कुणाच्याही पोटी पोरं जन्मावी तर अशी ! गरीबाची लेक आपल्या घराचं नाव उज्वल करणार , यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सुषमाची दिवसेंदिवस होणारी प्रगती त्यावर शिक्कामोर्तब करत होती.
सुषमा तशी खात्यापित्या घरची मूलगी परंतु आजोबांच्या दारूच्या व्यसनापाई ते कुटुंब देशोधडीला लागले होते. एकेकाळी गावात श्रीमंतांच्या यादित असणारे हे कुटुंब मोलमजुरी करून पोट भरायचे. सुषमाला एक लहान भाऊ होता. तो दुसर्या वर्गात शिकत होता. तोही सुषमासारखाच हुशार होता. सुषमासारखाच तोही आज्ञाधारी विद्यार्थी होता. जणू सुषमाचीच दुसरी आवृत्ती !
त्यादिवशी शाळेतून आल्यावर घरातील रोजची कामे आटोपून सुषमा आपल्या भावासोबत अभ्यास करत होती. सगळिकडे अंधार पडला होता. पण तिच्या वडीलांचा अजुन कुठे पत्ता नसल्याने तिची आई तिला म्हणाली , " सुषमा , अभ्यास झाला कागं ? "
" नाही आई , अजुन अर्धा पेपर सोडवायचा आहे. काही काम होतं का ?"
" तुझे बाबा अजुन आलेले नाहीत. मी म्हशी गोठ्यात बांधल्यात. त्यांना एकदा तेवढं गवत घाल गं." आईची आज्ञा होताच सुषमा अभ्यास बाजुला ठेवून म्हशींना गवत घालायला गोठ्यात गेली.
म्हशीला गवत घालून ती परत येत नाही तोच तिच्या कानावर भांडणाचा आवाज आला. तिला कळेना आपल्या घरात कोण कुणाशी भांडतोय ते. आजपर्यंत असा भांडणाचा प्रकार घरी कधीच घडला नव्हता. तिने सपरीवर येवून बघितलं तर तिचे बाबा आईसोबत मोठमोठ्याने भांडत होते. या भांडणाने तिचा भाऊ भेदरून रडत बसला होता. असं भांडण घरात कधीच घडलं नव्हतं.
सुषमा बाबांना आईशी भांडताना बघुन घाबरून गेली. काहीक्षण ती भांबावून गेली. काय करावे काही सुचेना. अशाही अवस्थेत तिने आपल्या लहान भावाला आपल्या जवळ घेत शांत करण्याचा प्रयत्न केला. दोघांचं भांडण अधिकच वाढत चाललं होतं. महिनाभरापूर्वी तिचे बाबा घरी नसताना टोल्यावरचा हरी बाबांची सायकल मागायला आला होता. त्याला बाजारला जायला सायकल हवी होती. हरी त्यांच्या घरकामात बोलवेल तेव्हा हजर असायचा. त्यामुळे त्याला नाही म्हणायचं कसं ? असा प्रश्न आईला पडला आणि तिने मागचा पुढचा विचार न करता त्याला सायकल देवून टाकली.
हरीने बाजारला नेलेली सायकल कुठे , कशी ठेवली कुणास ठावून , ती चोरीला गेली. बरेच दिवस आजुबाजुचे बाजार शोधुनही सायकल काही सापडली नाही. शेवटि बाबांनी पोलीस स्टेशन गाठुन सायकल चोरीची रिपोर्ट दिली. सायकल चोरीला गेल्याने बाबांची खूप पंचाईत झाली होती. बाहेरगावी जायला सारखं दुसर्याची सायकल मागावी लागायची. कुणी द्यायचं सहानुभूतीने ! तर कुणी चेष्टा करायचे. " सायकलवर लक्ष ठेव नाहीतर आमचीपण चोरीला जाईल सायकल." पोलिसांकडे गेलंतर त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं , "तपास सुरू आहे. सापडेल लवकरच. सापडल्यावर कळवतो." लोकांच्या बोलण्याने आणि पोलिसांच्या उत्तराने ते पार मेटाकुटिला आले होते. त्याच नैराक्षेतून ते आईशी भांडत होते. शेवटि तासाभराच्या खडाजंगीनंतर घर शांत झालं. सुषमाचा भाऊ तसाच झोपी गेला होता. सुषमालाही जेवायचं नव्हतच ! पण आईच्या आग्रहाने तिने कसंतरी दोनघास पोटात ढकलले आणि ती झोपी गेली.
घरातील या प्रकाराने सुषमा शाळेत काहिशी अबोल झाली. ती बर्याचदा तिच्याच विचारात गुंग राहु लागली. त्यामुळे कधीही अभ्यास न चुकवणार्या सुषमाचा अभ्यास चुकायला लागला. तिला सारखी बाबांच्या सायकलीची काळजी लागलेली असायची. शिष्यवृत्ती परीक्षा महिनाभरावर येवून ठेपली होती. शेवटच्या टप्यातील तिचा अभ्यास बोपचे सरांना काहीसा खटकु लागला. त्यामुळे एकदिवस त्यांनी दुपारच्या सुट्टित मुलांचे जेवण झाल्यावर तिला वर्गात बोलवून घेतलं.
सरांनी तिला अभ्यासाच्या अडचणीबद्दल विचारलं. तेव्हा ती रडायलाच लागली. सरांनी तिला धीर देत विश्वासाने विचारलं , तेव्हा तिने सारी हकिकत सरांना सांगितली. सारी हकिकत ऐकुण घेतल्यावर सर तिला म्हणाले , " सुषमा , तुला या परिस्थितून तुझ्या बाबांना बाहेर काढायचे असेल तर त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे."
" सर , कुठला उपाय ?" सुषमा आशेचा किरण दिसल्यासारखी म्हणाली.
" आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कटरे मॅडम यांनी यावर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम येणार्या विद्यार्थ्याला त्यांच्याकडुन पाच हजार रूपयांचे रोख बक्षिस घोषित केले आहे. तु हे बक्षिस मिळवून तुझ्या बाबांची सायकल परत मिळवून देवू शकतेस." सुषमा सरांच बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. तिला सरांचं बोलणं पटलं. आता जे काही करायचं ते तिच्याच हातात होतं. तिनं त्याचवेळी ठरवलं हे पहिलं बक्षिस आपण मिळवायचचं आणि त्यातून बाबांना नविन सायकल खरेदी करून द्यायची.
त्या दिवसापासून सुषमा आणखी जोमाने अभ्यासाला लागली. पहाटे चारला उठुन परीक्षेचा सराव संच सोडवू लागली. शाळेत बोपचे सरही तिला प्रेरीत करत होते. बाजारातील दहा बारा प्रकाषणांचे सरावसंच त्यांनी स्वखर्चाने आणून दिले होते. तिच्या अभ्यासावर त्यांचे चातकाप्रमाणे लक्ष होते. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे अनेक विद्यार्थी चमकले होते. परंतु यावेळी सुषमाच्या रूपाने शाळेचं नाव जिल्ह्यात करायची सुवर्ण संधी चालुन आली होती. तिला दवडणं अशक्य होतं. सुषमाचे एक स्वप्न शाळेची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती करणार होतं.
नेहमीचा तिचा अभ्यास बघता शिष्यवृत्ती परीक्षेत पास होणं तिच्यासाठी अवघड नव्हतं. पण तिला नुसतं पास होवून चालणार नव्हतं. तर जिल्ह्यात पहिलं येवून जिल्हाधिकार्यांचं बक्षिस मिळवायचं होतं. अभ्यासच तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालुन देणार होतं. बाबांची सायकलच्या विवंचनेतून सूटका करून देणार होतं.
वर्षभराची ढोरमेहनत करून तिने शेवटि परीक्षा दिली. पेपर चांगला गेला. बोपचे सरांनी तिचा सोडवलेला पेपर तपासला. त्यांना ती जिल्ह्यात येईल असा विश्वास वाटु लागला. शाळेतील सर्व शिक्षक तिच्या शिष्यवृत्तीच्या निकालाची वाट पाहु लागले. शेवटि दोन महिन्यानंतर निकालाचा दिवस उजाडला. सुषमासह शाळेतील सर्व शिक्षकांची घालमेल सुरू होती. अनेकांची स्वप्ने सुषमाच्या निकालावर येवून खिळली होती. बोपचे सरांनी निकाल घोषित झाल्याचे समजताच सर्वांच्या उपस्थितीत मोबाईलवर शाळेच्या मुलांचा निकाल बघायला सुरूवात केली.
सुषमाचा निकाल बघितल्यावर त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहु लागले. सुषमा राज्य गुणवत्ता यादित राज्यात मुलींमध्ये पहिली आली होती. सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या मैत्रीनिंनीतर तिला उचलून घेवून आनंद साजरा केला. सुषमावर आणि शाळेवर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला. जिल्हा परीषदेतून शिक्षणाधिकार्यांपासून ते खुद्द जिल्हाधिकारी कटरे मॅडम यांनी फोन करून सुषमाचे आणि शाळेचे अभिनंदन केले. सुषमा सोबतच बोपचे सरांचेही कौतुक होत होते. दुसर्या दिवशी सुषमाच्या मुलाखतीसह बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या. तिच्या घरीही पाहुण्यांनी अभिनंदनासाठी गर्दी केली.
आठवडाभरातच जिल्ह्याधिकार्यांचं पत्र शाळेला आलं. शिष्यवृत्ती धारकांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हापरीषदेत आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्रीही उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाला सुषमा , तिचे आईबाबा आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुषमाचा झालेला सत्कार बघुन तिच्या आईबाबांना मुलीचा खुप अभिमान वाटला. बक्षिस स्विकारल्यानंतर सुषमाने आपल्या मनोगतात आईबाबांसह शिक्षकांचे आभार मानले. खरंतर तिला हरवलेल्या सायकलीचे आभार मानायचे होते. तिच्यामुळेच तर सुषमामध्ये हे यश मिळवण्याचे बळ निर्माण झाले होते ! तिने मनोमन हरवलेल्या सायकलचे आभार मानले.
कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी सायकलचे दुकान गाठले. तिथे सरांनी दुकानदारांना नविन सायकल बांधायला सांगितली. तिच्या आईबाबांना हा प्रकार काही कळेना. शेवटि सायकल बांधून तयार झाल्यावर तिच्या बाबांनी न रहावून सरांना विचारलं , " सर , हि सायकल कुणासाठी घ्यायला लागलाय ?"
तेव्हा सुषमा म्हणाली , " बाबा , हिच तुमची नविन सायकल." सुषमाने बक्षिसाचं पाकिट उघडलं आणि त्यातले पैसे दुकानदाराच्या हातावर ठेवले. तिचे आई बाबा काहीच बोलले नाहीत. दोघांनी तिला कवटाळलं आणि आपल्या अश्रुंच्या बांधाला वाट मोकळी करून दिली.
लेखक - गुलाब बिसेन (अध्यापक )
शाळा - विद्यामंदिर उंड्री , पो. घोटवडे , ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर 416203
मो. नं. 9404235191
खूप छान प्रेरणादायी कथा.
उत्तर द्याहटवाप्रेरणादायी आणि बोधप्रद कहाणी प्रयत्नव्रत मुलींचे तिच्या शिक्षकांचे आणि महत्त्वाचे म्हणजे लेखकाचे अभिनंदन. well-done.
उत्तर द्याहटवाखूपच छन व प्रेरणादायी अशी कथा सर.
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाMotivational sir. I am proud of you
उत्तर द्याहटवागुलाब क्या बात, एका उत्कृष्ट लेखकाकडून उत्कृष्ट कथा, well done
उत्तर द्याहटवाएक उत्कृष्ट वास्तव, प्रेरणादायी कथा.
उत्तर द्याहटवा