शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचा वेगळा पैलू

 शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचा वेगळा पैलू


संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी सध्या कोरोनाच्या कहराने घरातच बंदिस्त झालाय. मुलांच्या किलबीलाटाने गजबजणार्‍या शाळा ओस पडल्यात. त्याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होत आहे. तसे बघितले तर विद्यार्थी हा केवळ शाळेतच शिकतो असे नाही. परंतु विद्यार्थ्यांना काही गोष्टी जाणिवपूर्वक शिकवाव्या लागतात. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. त्या गोष्टी शाळांमधून शिकवण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे वैश्विकीकरणाच्या या काळात शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने शिक्षकांचे अध्यापन बंद झाले. परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षक अखंडीत सुरू राहावे. शिक्षण बंद पडू नये यासाठी शिक्षक धडपडत आहेत. कुणी आॅनलाईन तर कुणी आॅफलाईन , कुणी गट कार्यातून तर कुणी समुह अध्यापनाद्वारे धडे देण्यात गुंतले. "शाळा बंद , शिक्षण सुरू" या धेय्याने प्रेरीत शिक्षक सर्वत्र धडपडताना दिसू लागले.


कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. तसे शासनाचे सर्व विभाग कामाला लागले. अशावेळी शिक्षण विभाग कसा मागे राहील. मग शिक्षकांना कुटुंब सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. आपात्कालीन परिस्थितीचे भान ठेवत राज्यातील लाखो शिक्षक कुटुंब सर्वेक्षणाच्या कामात झोकुन देवून कामाला लागले. पुढे पोलिस प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेता पोलिसांच्या मदतीसाठी चेक पोष्टवर ड्युटी लावण्यात आली. तसे पाहता राष्ट्रिय जनगणना आणि सार्वत्रीक निवडणूक ही दोनच अशैक्षणिक कामे शिक्षकांना लावता येतात. परंतु आपात्कालीन परिस्थितीचे भान राखून तेही काम मोठ्या निष्ठेने केले. आजही "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. अशाही परिस्थितीत मुलांना आॅनलाईन , आॅफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतच आहेत.


शिक्षक हा समाज घडवणारा घटक आहे. तो समाजाला दिपस्तंभाप्रमाणे योग्य दिशा देण्याचे काम करत असतो. त्याची बांधिलकी केवळ विद्यार्थी आणि शाळेपूर्तीच मर्यादित नसून तो समाज सुधारणेचेही काम सदैव करत असतो. कधी पुढे होवून तर कधी पडद्यामागून आपली भूमिका वठवत असतो. सध्याच्या कोरोनाच्या आपात्कालीन परिस्थितीमध्येही शिक्षक नावाचा घटक आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. शिक्षक हा सामान्य नसतो , तर तो असामान्य गोष्टी  करून दाखवण्याचे धाडस आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरत असतो.


ज्या प्रमाणात आपल्या देशात खासकरून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. तसे दवाखाण्यात रूग्णांना बेड कमी पडू लागले. आॅक्सिजनची सोय असलेल्या बेडचा काळाबाजार होवू लागला. दवाखाने रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील आकारून लूट करू लागले. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता हवालदिल होवून कोरोना लवकर जाण्याचीच प्रार्थना करत आहे. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना आरोग्य विभाग , पोलीस प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. हे सर्व सुरू असतानाच राज्यभरातील शिक्षक "ज्ञानयज्ञ" सतत तेवत ठेवण्याचे काम करत आहेत.


कोरोनाकाळातील या अशैक्षणिक कामांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला फटका बसू न देता शिक्षक लढत आहेत. अनेक शिक्षक कर्तव्यावर असताना कोरोनाचे बळी ठरले असतानाही एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम नेटाने करतच आहेत. हे कमी की काय म्हणून शिक्षक संघटीत स्वरूपात कोरोना सेंटर , कोरोना योद्धे यांना मदतीचा हात देत आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक संघटनेने स्वखर्चाने स्वतंत्र कोवीड सेंटरची उभारणी करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 


सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिक्षक संघटनांच्या माध्यमातून कोवीड सेंटरला अॅम्बूलंस , जनरेटर , आॅक्सिजन सिलेंडर भेट देवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आदर्शवत काम सुरू आहे. हे एक प्रातिनिधीक स्वरूपाचे उदाहरण आहे. राज्यभर अशाप्रकारची कामे शिक्षकांच्या माध्यमातून सध्या सुरू आहेत. शिक्षकांची समाजाविषयीची हिच बांधिलकी खरे समाजशिक्षणाचे काम करेल आणि उद्याचा संवेदनशील समाज घडवण्यात हातभार लावेल यात शंका नाही.


लेखक - श्री. गुलाब बिसेन ,  जिल्हा समन्वयक कोल्हापूर , अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा