आॅनलाईन शिक्षण - एक मृगजळ
आॅनलाईन शिक्षण - एक मृगजळ
कोविड १९ या महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जग एक बंदिशाळा झालेले अाहे. शहरी भागापासून ग्रामिण भागापर्यंत सर्वत्र कोविड १९ ने आपली पाळेमुळे पसरली आहेत. याचा शेतीपासून व्यापारापर्यंत अशा सर्वच क्षेत्रांना कधी नव्हे एवढा फटका बसलाय. यातून शिक्षण क्षेत्रही सुटु शकलेले नाही. देशातील शाळा , काॅलेज , विद्यापीठांना कुलुपबंद व्हावे लागले आहे. विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडल्या आहेत. औपचारीक शिक्षणाचे महत्वाचे केंद्र असलेल्या शाळाच बंद असल्याने साहजिकच मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आणि शिक्षकांकडुन प्रयत्नही केले जात आहेत. त्यात घरबसल्या ठिकाणी करता येणारे आॅनलाईन शिक्षण महत्वाचे आहे. सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता शिक्षण घेण्याच्या दृष्टिने आॅनलाईन शिक्षण हे माध्यम उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाचे महत्व वाढत आहे. याद्वारे अध्ययन - अध्यापन हि क्रिया घरबसल्या घडतात. शहरी भागासोबतच ग्रामिण भागातही आॅनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु शहरी आणि ग्रामिण भागाचा तुलनात्मक विचार केल्यास आॅनलाईन शिक्षणाच्या बाबतीत दोघांत मोठी तफावत दिसून येते.
आॅनलाईन शिक्षणासाठी इंटरनेट , अॅंड्राईड मोबाईल , लॅपटाॅप ,संगणक अशा अत्याधुनिक भौतिक साधनांची गरज असते. शहरी भागातील पालकांचा विचार केल्यास ग्रामिण भागातील पालकांच्या तुलनेत उत्पनांची साधने अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने भौतिक साधनांची उपलब्धता असते. तरी सर्व पालकांकडे ते उपलब्ध असतीलच असे नाही. शहरी भागातील मध्यम वर्गाची पोटासाठी रोजची कसरत सुरूच असते. झोपडपट्टीसारख्या भागातील पालकांच्या परिस्थितीविषयी वेगळे बोलायची गरज नाही.
लाॅकडावूनच्या सुरूवातीच्या काळात शहरी भागातील शाळांनी आॅनलाईन शिक्षणात आघाडी घेतली. हा प्रयोग पहिल्यांदाच केला जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरूवातीच्या काळात कुतुहल दिसून आले. परंतु थोड्याच दिवसांनी मुलांचा स्क्रिन टाईम वाढल्याने डोळ्यांच्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले.
ग्रामिण भागाच्या समस्यातर याहुन वेगळ्याच आहेत. मुळात ग्रामिण भागात अजुनही मोबाईलचे नेटवर्क पोहचलेले नाही. बहुतांश भागात इंटरनेट सेवेची वाणवा आहे. शेकडो गावांत विजेचा लंपंडाव सुरू असतो. हजारो गावे अजुनही नाॅट रिचेबल आहेत. अशा परिस्थितीत आॅनलाईन शिक्षण देणे आणि घेणे अवघड होवून बसले आहे. ग्रामिण भागातील पालकांचे शेती आणि मजुरी यावर उदरनिर्वाह चालत असल्याने उत्पनांच्या अत्यल्प उपलब्धतेत मोबाईलसारखी चैन परवडणारी नाही. आताकुठे त्यांच्या हातात साधे फोन आले आहेत. अशा परिस्थितीत ग्रामिण पालकांना आधुनिक मोबाईल घेणे आणि त्याला माहागडे रिचिर्ज करणे परवडणारे नाही.
राज्यात ग्रामिण भागात अनेक उपक्रमशिल शिक्षकांनी अनंत अडचणींचा सामना करत आॅनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न केला. आजही करत आहेत. परंतु यामध्ये आॅनलाईन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. जिथे मोबाईलला रेंज आणि इंटरनेटची सेवा उपलब्ध आहे , अशा ठिकाणी आपल्या मुलांचे शिक्षण खंडित पडु नये यासाठी पदरमोड करून महागडे मोबाईल खरेदीही केलेत. आपली कामे सोडुन मुलांकडे लक्ष देता येवू न शकल्याने अनेक ठिकाणी मुले अभ्यास सोडुन नको त्या कामात गुंतल्याच्या घटना दृष्टिस पडत आहेत. पालकांनी आॅनलाईन अभ्यासासाठी मोबाईल घेवून न दिल्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या काही घटना घडल्या आहेत. अशा विद्यार्थी आणि पालकांसमोरील अनंत अडचणींमुळे आॅनलाईन शिक्षण ग्रामिण विद्यार्थ्यांनातरी एक मृगजळच ठरत आहे.
लेखक - गुलाब बिसेन , प्राथमिक शिक्षक , विद्यामंदिर उंड्री , ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ४१६२३०
मो. नं. ९४०४२३५१९१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा